डॉ. हमीद दाभोलकर, कार्यकर्ता, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
भारतीय नागरिकांच्या आयुष्यातील खूप सारे निर्णय हे जात आणि धर्म या दोन गोष्टींच्या भोवती फिरत असतात ही नाकारता येऊ शकेल अशी गोष्ट नाही. अगदी प्रत्येक निवडणुकीतही आपल्याला याचा अनुभव येतो. जात आणि धर्म यांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपले जीवन आणि सार्वजनिक व्यवहार असावेत याविषयी अनेक वेळा चर्चा होते; पण प्रत्यक्षात त्या दिशेने कार्य करताना मात्र अनेक अडचणी येतात.
यासाठी आंतरजातीय/धर्मीय विवाह हा जात आणि धर्माच्या पलीकडे जाणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील त्यांच्या 'अनहिलेशन ऑफ कास्ट' या ग्रंथात आंतरजातीय विवाहांमुळे जात निर्मूलनाच्या दिशेने कसे पाऊल पडू शकते हे नमूद केले आहे. आंतरजातीय/धर्मीय विवाहांमुळे जात आणि धर्मात मोकळेपणा येऊ शकतो. साहचर्य आणि सामंजस्य वाढू शकते.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसमार्फत नुकतेच आंतरजातीय धर्मीय विवाह करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी वधू-वर सूचक मंडळ चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जात ही कुठलाही वैद्यानिक आधार नसलेली अंधश्रद्धा आहे, असे डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणत असत. अंधश्रद्धा निर्मूलनाइतकेच ते जाती-अंताच्या लढाईविषयीदेखील आग्रही असत, जवळजवळ गेली दोन दशके महाराष्ट्र अंनिस ही आंतरजातीय/धर्मीय विवाहांना पाठबळ देणारी यंत्रणा राबवते. आजपर्यंत अशा शेकडो विवाहांना अंनिस कार्यकर्त्यांनी पाठबळ दिले आहे. अनेक ठिकाणी अशा लग्नांना दोन्ही बाजूंच्या घरच्या लोकांचा टोकाचा विरोध असतो. त्यामधून या तरुणांच्या जिवाला धोकादेखील होऊ शकतो, अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या 'सेफ हाऊस गाइड लाइन 'प्रमाणे महाराष्ट्रातील पहिले 'सेफ हाऊस' अंनिसने चालू केले आहे. आंतरजातीय/धर्मीय वधू-वर सूचक मंडळ हे याच प्रयत्नातले पुढचे पाऊल आहे.
या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ज्या विवाह इच्छुक व्यक्तींना आंतरजातीय/धर्मीय विवाह करण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांच्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करून नोंदणी करायची आहे. महाराष्ट्र अंनिस मध्यवर्ती कार्यालयात हे सगळे नोंदणी झालेले फॉर्म एकत्र करून तेथून हे वधू-वर सूचक केंद्र चालेल. यासाठी वेबसाइट तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून पुढे यासंदर्भात स्वतंत्र अॅपदेखील तयार केले जाणार आहे. समाजात जसे स्वयंप्रेरणेने आंतरजातीय/धर्मीय विवाह करणाऱ्यालोकांचे प्रमाण वाढेल तसे जातीच्या आणि धर्माच्या भिंती ढासळू लागतील, अशी अपेक्षा आहे आणि त्याला आधारही आहे. एकमेकांना समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वयंजातीचा/धर्माचा वृथा अभिमान, आपलीच जात/धर्म सर्वश्रेष्ठ आहे ही समजूत.. अशा अनेक गोष्टींना हळूहळू तडे जाऊ लागतील, महाराष्ट्र अंनिसमार्फत पाठबळ देण्यात आलेल्या अनेक आंतरजातीय/धर्मीय जोडप्यांमध्ये हे घडताना दिसून आले आहे. जाती-धर्माच्या भिंती गळून पडताना दिसून आले आहे. जाती/धर्माच्या पलीकडे जाऊन हे लोक माणूस म्हणून एकमेकांशी संवाद करू शकतात त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या पुढच्या पिढीवर देखील होताना दिसतो असा अनुभव आहे. ही फारच सकारात्मक गोष्ट आहे.
हा उपक्रम केवळ आंतरजातीय/धर्मीय विवाहांपुरता मर्यादित न राहता अशा प्रकारे होणाऱ्या सर्व विवाहांमध्ये आपला जोडीदार विवेकी पद्धतीने निवडणे आणि परिचयोत्तर विवाह यांना प्राधान्य ही गोष्ट महत्त्वाची आहे. ही प्रक्रिया दोन्ही व्यक्तींच्या निर्णय स्वातंत्र्याचा संपूर्ण आदर करून होणे अपेक्षित असते. हे विवाह शांततामय, प्रेमळ मार्गाने कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन, महात्मा फुले यांनी सांगितलेल्या सत्यशोधक पद्धतीने अथवा विशेष विवाह नोंदणी कायद्यामार्फत होणे सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. आपल्या समाजात जात आणि धर्माच्या जाणिवा अत्यंत खोलवर रूजलेल्या आहेत. केवळ आंतरजातीय/धर्मीय विवाह केल्याने त्या लगेच नष्ट होतील अशी भाबडी अपेक्षा यामध्ये नाही; पण जाती आणि धर्माच्या भिंती अधिकाधिक उंच होत असलेल्या या कालखंडात जात-धर्माच्या पलीकडे जाणारा समाज निर्माण करण्यासाठी केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.