मुंबई : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले व त्यांचा मुलगा अमित भोसले यांच्यावर २४ फेब्रुवारीपर्यंत कारवाई करणार नाही, असे आश्वासन ईडीने उच्च न्यायालयाला सोमवारी दिले. त्यावर न्यायालयाने अविनाश व अमित भोसले यांना ईडीने बजावलेल्या समन्सनुसार १७ फेब्रुवारी रोजी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.ईडीने १० फेब्रुवारी रोजी बजावलेले समन्स व परकीय चलन नियमन कायद (फेमा) अंतर्गत नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले व त्यांचा मुलगा अमित भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.सोमवारच्या सुनावणीत ईडीने अविनाश व अमित भोसले यांना पुढील सूनवणीपर्यंत अटक करणार नाही, असे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने अविनाश व अमित भोसले यांना १७ फेब्रुवारीला ईडी कार्यालयात चौक्षिसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले.ईडीने या आठवड्यात अविनाश भोसले याच्या पुणे, मुंबई आणि कोल्हापूर येथील कार्यालयांवर छापा मारला. तसेच १० फेब्रुवारी रोजी समन्स बजावून त्याच दिवशी चौकशीसाठी ईडीच्या मुंबई कार्यालयात हजर राहण्यास सांगितले. पुण्यात असताही आपल्याला व मुलाला जाणुनबुजून त्याच दिवशी मुंबई कार्यालयात हजर राहण्यास सांगितले, असे भोसले यांनी याचिकेत म्हटले आहे.
अविनाश भोसले व मुलाला २४ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम दिलासा, कठोर कारवाई न करण्याचे ईडीचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 2:30 AM