समीर वानखेडे यांना अंतरिम दिलासा; २२ मेपर्यंत अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 11:28 AM2023-05-20T11:28:09+5:302023-05-20T11:29:08+5:30
भारतीय महसूल सेवेतील अधिकारी असलेले समीर वानखेडे यांना २०२१ मध्ये एनसीबीमध्ये नियुक्त करण्यात आले.
मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन याला गोवण्यात येऊ नये, यासाठी शाहरूखकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर २२ मेपर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई करू नका, असे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयला शुक्रवारी दिले.
भारतीय महसूल सेवेतील अधिकारी असलेले समीर वानखेडे यांना २०२१ मध्ये एनसीबीमध्ये नियुक्त करण्यात आले. खंडणी, लाच प्रकरणी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता सीबीआयच्या बीकेसी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याची हमी दिल्यावर उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायालयाने वानखेडे यांच्यावर सोमवारपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश सीबीआयला दिले.
युक्तिवादात काय?
भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या कलम १७ (ए) अंतर्गत सीबीआयने गुन्हा घडल्यानंतर चार महिन्यांत चौकशी करणे अपेक्षित आहे. गुन्हा ऑक्टोबर २०२१ मध्ये घडला. आतापर्यंत सीबीआयने काहीही केले नाही, असा युक्तिवाद वानखेडे यांच्यातर्फे रिझवान मर्चंट यांनी केला.
सीबीआयचा आक्षेप...
- वानखेडे यांच्या याचिकेवर सीबीआयने आक्षेप घेतला. वानखेडे यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण हवे असल्यास त्यांच्याकडे अन्य पर्याय आहे, असे सीबीआयचे वकील कुलदीप पाटील यांनी न्या. शर्मिला देशमुख व न्या. ए. डॉक्टर यांच्या खंडपीठाला सांगितले.
- वानखेडे यांच्यावर कारवाई करण्यास दोन दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली. त्यामुळे मंजुरी मिळाल्यानंतर चौकशीस सुरुवात केली, असे पाटील यांनी म्हटले.
- मात्र, गुन्हा घडल्यानंतर चार महिन्यांत चौकशी का केली नाही, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित करताच पाटील यांनी सूचना घेण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ मागितली.
एनसीबीने केलेल्या तक्रारीवरून सीबीआयने वानखेडे व चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बदला घेण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा वानखेडे यांनी न्यायालयात केला. कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणाचा तपास वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली विशेषत: एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली झाला, असा दावा वानखेडे यांनी केला आहे.
‘सिंह हे एसआयटीचे प्रमुख होते आणि ते स्वत:च्याच वर्तनाची चौकशी करीत आहेत. स्वत:ची काही कृत्ये झाकण्यासाठी सिंग प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी ते याचिकादाराचा छळ करीत आहेत. एनसीबी सोडून गेल्यानंतरही सिंह त्यांचा छळ करीत आहेत, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे.