कोल्हापूर : आॅनर किलिंगविरोधी परिषदेत करण्यात आलेल्या आंतरजातीय विवाहावर एका मुलीच्या आई-वडिलांनी आक्षेप घेतला. शिवाय परिषदेच्या ठिकाणी सोमवारी दुपारी गोंधळ घातला.दीड तास चाललेल्या या प्रकारामुळे राजर्षी शाहू स्मारक भवन परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.येथील शहीद गोविंद पानसरे विचार मंचतर्फे संबंधित परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आकाश कांबळे व सोनाली कल्याणकर यांचा आंतरजातीय विवाह करण्यात आला. विवाह झाल्याचे समजताच या ठिकाणी सोनालीचे आई आणि वडील दाखल झाले. त्यांनी या विवाहावर आक्षेप घेत मुलीला परत नेण्याची भूमिका घेतली. परिषदेसाठी उपस्थित काही कार्यकर्त्यांनी त्यांना सभागृहाखाली थांबवून समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. परिषदेच्या संयोजकांनी पोलिसांना बोलावून घेतले. आई-वडिलांनी त्यांच्यासमोरही गोंधळ घातला. काहीजणांना शिवीगाळ केली. अखेर आई-वडिलांना लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. (प्रतिनिधी)माहिती दिली होती.... आकाश आणि सोनाली यांच्या विवाहाची सोनालीच्या आई-वडिलांना माहिती दिली होती. तरीही त्यांनी हा विवाह होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे कायदेशीर बाबींची पूर्तता करून आकाश व सोनालीचा विवाह करण्यात आला आहे. त्यांना संरक्षण मिळावे, यासाठी पोलिसांकडे अर्ज करणार आहे. शिवाय आई-वडिलांची समजूत काढणार असल्याचे वर्ल्ड फेडरेशन आॅफ यूथचे उपाध्यक्ष गिरीश फोंडे यांनी सांगितले.
आंतरजातीय विवाहात आई-वडिलांचा गोंधळ
By admin | Published: January 12, 2016 3:06 AM