ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. १६ - सध्या सत्तेत असलेले भाजपा व शिवसेना हे परस्परांना निजाम आणि रझाकाराची उपाधी देत असून जळगाव जिल्ह्यात तर माजी मंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात वाद सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ सरकारविरोधात असंतोष निर्माण करून जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे प्रभारी व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दुपारी झालेल्या या मेळाव्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांना वेळ नाहीमहाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा भाग असलेला मराठवाडा दुष्काळामुळे होरपळत आहे. पक्षाचे नेते शरद पवार यांनी मराठवाड्यात जाणून शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेतले आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात ४० प्रचारसभा घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेण्यास महाराष्ट्रात येण्यासाठी वेळ नाही. सुरुवातीला बाबरी मशिद आणि राममंदिर उभारणीचा मुद्दा भाजपातर्फे उपस्थित करण्यात आला होता. आता हिंदू- मुस्लीम वाद उभा करीत मुस्लिम मुक्त राष्ट्राच्या घोषणा भाजपाच्या काही नेत्यांकडून सुरु आहे. पंतप्रधान किंवा भाजपाचे वरिष्ठ नेते मात्र याबाबत मौन धारण करून आहेत.