- शिवराज बिचेवारनांदेड : २०१८ पासून पोलीस दलात खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षकांच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यात ही परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ही परीक्षा तूर्त रद्द होणार नसल्याचे सांगितले होते. त्यात आता ७६५ पदांसाठी येत्या ऑक्टोबर महिन्यात परीक्षा घेण्यासंदर्भात पत्र त्यांनी लोकसेवा आयोगाला पाठविले आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
पोलीस दलात वेळेवर प्रमोशन मिळत नाही. त्यामुळे अनेक वर्षे कर्मचारी त्याच जागेवर राहतो. सेवानिवृत्तीपर्यंत पोलीस उपनिरीक्षकापर्यंतही पोहोचत नाही. त्यामुळे यात बदल करण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. महासंचालक पांडे यांनी त्यासाठी १०-२०-३० असा प्रस्ताव पाठविला आहे. या निर्णयामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रमोशनची संधी मिळणार आहे.
महासंचालकांनी खात्यांतर्गत २५ टक्के पोलीस उपनिरीक्षकांची भरती ही परीक्षेतून होणार असून २०२४ पर्यंत ती चालणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रत्येकाला तीन संधी देण्यात येणार आहे, परंतु नव्याने भरती होणाऱ्यांना ही संधी मिळणार नाही असेही स्पष्ट केले होते. खात्यांतर्गत सरळसेवा मर्यादित पोलीस उपनिरीक्षकांच्या मंजूर २ हजार ४६५ पदांपैकी सेवाज्येष्ठता यादीनुसार १ हजार ९१७ प्रत्यक्ष कार्यरत आहेत.
पोलिसांना शिवशाहीचा प्रवास मोफत मिळणार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना वॉरंट दिला जातो. या वॉरंटवर ते बस आणि रेल्वेमध्ये प्रवास करतात. परंतु, त्यांना आजपर्यंत शिवशाहीमध्ये प्रवास करण्याची मुभा नव्हती. मात्र पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या कर्मचाऱ्यांना शिवशाहीमध्ये प्रवास करण्याची सवलत द्यावी, असे पत्र एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांना पाठविले आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना प्रवास अधिक सुखकर होणार आहे.