ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि.10 - असोसिएशन आॅफ एनर्जी इंजिनिअर्स इन वॉशिंग्टन (अमेरिका) यांचा नाविन्यपूर्ण ऊर्जा प्रकल्पासाठीचा प्रतिष्ठित आंतररराष्ट्रीय वरोरा येथील पुरस्कार महारोगी सेवा समिती वरोरा संस्थेला मिळाला आहे. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समिती वरोरा या संस्थेने आंतरराष्ट्रीय पातळीवरचा नाविन्यपूर्ण ऊर्जा प्रकल्पाबद्दलचा २०१६ सालचा पुरस्कार मिळाला आहे.
आशियाच्या उपखंडातील अपारंपरिक ऊर्जा वापराच्या आनंदवनातील नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. सन १९४९ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे प्रमुख आणि सचिव डॉ. विकास आमटे आणि विश्वस्त गौत करजगी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार देण्याचा कार्यक्रम असोसिएशन आॅफ एनर्जी इंजिनिअर्सच्या ३९ व्या जागतिक ऊर्जा इंजिनिअर्सच्या परिषदेत २० सप्टेंबर रोजी वॉश्गिंटन येथे झाला. डॉ. विकास आमटे गुरूवारी विदेशातून परतल्यावर त्यांनी ही माहिती दिली.
असोसिएशन आॅफ एनर्जी इंजिनिअर्स (एइइ) ही स्वयंसेवी संस्था वैज्ञानिक आणि शैक्षणिक दोन्ही दृष्टीने ऊर्जा क्षेत्रातील उद्योगात शाश्वत विकासाच्या योजनाना उत्तेजन देण्याचे कार्य करीत आहे. हे कार्य व्यावसायिक पद्धतीचे असून संस्थेचे जगभरातील ९८ देशांत १८ हजारांहून अधिक सभासद आहेत.
आनंदवनमध्ये विविध प्रकारच्या शारीरिक अडचणी असलेल्या सुमारे २५०० व्यक्ती राहतात. त्यात कुष्ठरुग्ण, तरूण व दिव्यांग तसेच अनाथ, निराधार अशा व्यक्तींचा समावेश आहे. एकेकाळी सुदृढ़ समाजाने नाकारलेले हे लोक आज सामाजिकदृष्ट्या स्वाभिमानाचे जिणे जगत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी जागतिक पातळीवर पुनर्वसनाचे नवीन मापदंड प्रस्थापित केले आहेत. त्यांनी सामाजिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या आव्हानात्मक असे कार्यक्रम अमलात आणले आहेत.
अमेरिकेच्या या पुरस्कारामुळे महारोगी सेवा समितीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याचबरोबर आनंदवन ही नाविन्यपूर्ण आणि वैशिष्टयपूर्ण कामांची प्रयोगशाळा आहे, हे नामाभिधान सार्थ ठरवले आहे. संस्था नेहमीच नवीन पण उचित अशी साधने आणि तंत्रज्ञान विकसित करण्यात आघाडीवर असते. येथे नैसर्गिक स्त्रोतांचा वापर केला जातो. महारोगी सेवा समितीच्या सहा दशकांच्या वाटचालीत संस्थेने लक्षणीय अशी पर्यावरण पूरक कामे केली आहेत. सोबतच ऊर्जेची निर्मिती करताना पर्यावरणस्नेही स्त्रोतांचा वापर प्राधान्याने केला आहे.