पिंपरी : आघाडी सरकारच्या काळात मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र उभारण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. मात्र, गेली आठ वर्षे प्रकल्प कागदावरच आहे. सरकार बदलल्यानंतर हा प्रकल्पच बासनात गुंडाळण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आंतराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र उभारण्याचे श्रेय आघाडीला मिळू नये, म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. श्रेयवादाच्या राजकारणामुळे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रास खोडा घातला जात आहे. त्यामुळे निधी मिळूनही प्रकल्प सुरू होण्यास अजून मुहूर्त सापडलेला नाही.पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवर मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र उभारण्याचे नियोजन २००९ मध्ये करण्यात आले. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या कल्पनेतून हे प्रदर्शन केंद्र उभारण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यास तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मकता दर्शविली होती. सुरुवातीला हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारावा, असा विचार पुढे आला. त्यानुसार नियोजन केले होते. मात्र, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने प्राधिकरण आणि राज्य सरकारच्या मदतीने हा प्रकल्प राबविण्याचे नियोजन झाले. त्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष दिलीप बंड यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शन केंद्रांचा अभ्यास केला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शन केंद्रांचा, तसेच देशातील एकमेव केंद्र असणाऱ्या बंगळूर येथील केंद्राचा अभ्यास केला. या सर्व केंद्रांपेक्षा पिंपरी-चिंचवडमधील केंद्र आगळेवेगळे करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. (प्रतिनिधी)आराखड्यात बदलया प्रकल्पासाठी संबंधित कंपनीने दहा वर्षांचा कालावधी निश्चित केला होता. त्यासाठी सुमारे हजार कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. त्यापैकी सात वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, या प्रकल्पाची साधी कुदळही मारण्यात आलेली नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आराखड्यात आता बदल केले आहेत. टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात प्रदर्शन केंद्र आणि कव्हेन्शन सेंटरला भौतिक सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे. त्यात रस्ते, वीज, जलनिस्सारण या गोष्टींचा समावेश आहे. पहिल्या टप्प्याचे कामही सुरू झालेले नाही. हे काम सुरू कधी होणार, असा प्रश्न सुज्ञ नागरिक करीत आहेत. केंद्र नागपूरला नेण्याचा घाटआंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र पिंपरी-चिंचवडमध्ये झाल्यास उद्योगनगरीचे नाव जागतिक नकाशावर ओळखले जाईल आणि या कामाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसला जाईल, या भीतीने हे केंद्र नागपूरला नेण्याचा घाट केंद्र आणि राज्यातील नेत्यांनी घातला आहे. त्यामुळे येथील मूळ प्रदर्शन केंद्र होणार की नाही या विषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आंतरराष्ट्रीय केंद्राच्या आराखड्यास मंजुरी दिली होती. तसेच पहिल्या टप्प्यासाठी शंभर कोटींचा निधी मिळालेला होता. निधी मिळूनही हे काम सुरू झालेले नाही. असा होता आराखडापिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी असल्याने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोशी येथील पेठ क्रमांक ५ आणि ८ मधील दोनशे एकर जागेवर केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आले. पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अॅन्ड कन्व्हेन्शन सेंटर मोशी लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव हे या कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यानुसार या प्रकल्पाचा कृती आराखडाही तयार करण्यात आला. त्यात सात प्रदर्शन केंद्र, एका मुख्य प्रदर्शन केंद्रासह कन्व्हेन्शन सेंटर, गोल्फ कोर्स, पंचतारांकित हॉटेल, व्यापारी कार्यालये, रिटेल मॉल केंद्र उभारण्याचे नियोजन होते.सल्लागारावरील खर्च गेला वायाप्राधिकरणाने सुरुवातीला आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचा आराखडा तयार करण्याचे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले होते. त्यासाठी तीन कोटी रुपये खर्चही करण्यात आला. त्यानुसार प्राथमिक आराखडाही तयार करण्यात आला. त्यावर नगरविकास खात्याचे सचिव, प्राधिकरणाचे अध्यक्ष, विभागीय आयुक्त यांच्यात चर्चाही झाली होती. मात्र, पीपीपी मॉडेलसाठी एकही आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी पुढे न आल्याने सल्लागारावरील खर्च वाया गेला आहे.
आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राची आठ वर्षांपासून प्रतीक्षा
By admin | Published: June 03, 2016 12:35 AM