कोल्हापूर - दिल्ली येथे सुरू असलेल्या 64 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का रवींद्र पाटील हिला दहा मीटर एयर पिस्टल प्रकारात युथ गटात सांघिक सुवर्णपदक मिळाले. या स्पर्धेत भारतातील 16 राज्यातून 499 मुलींनी भाग घेतला होता .अनुष्काने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत शर्वरी भोईर व जानवी देशमुख यांच्या मदतीने 1683 गुणांची कमाई करत दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले .या स्पर्धेत तुल्यबळ मांडल्या जाणाऱ्या दिल्ली ला 1679 गुणांसह रौप्य व उत्तर उत्तरप्रदेशला 1675 गुणांसह कास्य पदकावर समाधान मानावे लागले.
कोरोनाच्या काळानंतर परत एकदा महाराष्ट्राचे खेळाडू शूटिंग विश्व गाजविण्यास सज्ज झाले आहेत हेच अनुष्काने दाखवून दिले.कोरोना चा काळ सर्वच खेळाडूंसाठी कठीण परीक्षेचा काळ होता पण अनुष्काने या कठीण परिस्थितीतही सकारात्मक विचार करत आपला वेळ वाया न जाऊ देता तिने करोना काळात शास्त्रीय संगीताचा अभ्यास करून प्रथम परीक्षा प्रथम श्रेणीत पास झाली आपले शारीरिक मानसिक आरोग्य चांगले रहावे यासाठी अनुष्काने योगशिक्षक पदविका कोर्स 92 टक्के गुण मिळवत घवघवीत यशा सह पूर्ण केला . कोरोना काळात अनुष्काने मोफत ऑनलाइन योगशिबिर घेतली आईच्या मदतीने Yoga for Good Health हा उपक्रम राबविला. कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो मुलांना तिच्या या उपक्रमाचा उपयोग कोरोना काळात आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी झाला. खेळाडू खेळाबरोबरच सामाजिक कार्यातही मागे नसतात हेच अनुष्काने सिद्ध केले .अनुष्काने याअगोदर जर्मनी येथील जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धेत व इराण येथील आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताला सांघिक सुवर्णपदक मिळवून दिले आहे .यापुढेही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचे तिचे स्वप्न आहे.
अनुष्का कोल्हापूर येथील गोखले कॉलेज येथे बीएस्सी कम्प्युटर सायन्स चे शिक्षण घेत असून तिला संस्थेचे सेक्रेटरी जयकुमार देसाई, मंजिरी देसाई ,उपाध्यक्ष सावंत सर, प्राचार्य पी के पाटील ,क्रीडाशिक्षक कांबळे सर यांचे प्रोत्साहन लाभले आहे .अनुष्का कोल्हापूर क्रीडा प्रबोधिनीची अनिवासी खेळाडू आहे तिला प्रबोधिनीचे प्राचार्य चंद्रशेखर साखरे ,नवनाथ फडतरे, ऑलम्पिक खेळाडू गगन नारंग, पवन सिंग, माजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, युवराज साळुंखे, विनय पाटील, युवराज चौगुले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.