जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नारीशक्तीला सलाम करण्याच्या उद्देशानं lokmat.com नं गेली दोन वर्षं 'बाईमाणूस' हा उपक्रम यशस्वीपणे राबवला. प्रत्येक स्त्रीला माणूस म्हणून वागवा, हा संदेश 'बाईमाणूस' मधून जनमानसात पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर, यावर्षी आम्ही विविध क्षेत्रातील 'यशस्विनीं'ची यशोगाथा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. विशेष म्हणजे, या उपक्रमात आम्ही आमच्या वाचकांनाही सहभागी करून घेणार आहोत.
स्त्री ही अबला नाही, उलट ती दुर्गा आहे, लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, हे महिलांनी कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवलं आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज सर्व क्षेत्रांत स्त्रिया मोलाचं योगदान देत आहेत. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, पाळण्याची दोरी आणि घराची जबाबदारी सांभाळून त्या यशाची शिखरं सर करत आहेत. काही जणी 'गृहिणी' हे महत्त्वाचं पद भूषवत पुढची पिढी घडवत आहेत.
महाराष्ट्रातील काही 'यशस्विनीं'च्या कार्याची दखल अगदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय. पण, कित्येक जणींच्या संघर्षमय यशाची गोष्ट अजूनही एका चौकटीपुरतीच मर्यादित आहे. ही चौकट आपल्याला मोडायची आहे. अशा यशस्विनींची गोष्ट सर्वांपुढे आणणं, हाच 'लोकमत यशस्विनी'मागचा उद्देश आहे. 'ती'च्या कर्तृत्वाची ही गोष्ट कित्येक जणींना प्रेरणा देऊ शकेल, नवं बळ आणि उमेद देऊ शकेल.
महाराष्ट्रातील अशा 'यशस्विनी' शोधायचं काम लोकमत तुमच्या साथीनं करणार आहे. यात तुम्हाला बक्षिसं जिंकण्याचीही संधी आहे. त्यामुळे तुम्ही पाहिलेली 'यशस्विनी' आठवून ठेवा. नेमकी स्पर्धा काय आहे, हे आम्ही लवकरच जाहीर करतोय!