मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन आता हिंसक वळणावर जाऊन पोहोचले असून बीडमध्ये याचे सर्वात जास्त पडसाद उमटले आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून आंदोलनांनी उग्ररुप धारण केले आहे. सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाल्याने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी सोमवारी रात्री आठ वाजता तत्काळ संचारबंदी आदेश लागू केले आहेत. परंतू, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर हे निर्बंध आणखी वाढविण्यात आले आहेत.
बीडमध्ये १ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच बीडमध्ये एसआरपीएफच्या ५ तुकड्या दाखल झाल्या आहेत. रात्री बीड एसटी डेपोतील ७२ बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मराठवाडा रेंजचे पोलीस महानिरीक्षक चव्हाण बीडमध्ये दाखल झाले आहेत.
संचारबंदी आदेशानुसार बीड जिल्हा मुख्यालय व सर्व तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटरच्या हद्दीपर्यंत सर्व राष्ट्रीय महामार्गावर पुढील आदेशापर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
साताऱ्यामध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्ह्यात आज बंदची हाक देण्यात आली आहे. आज पुकारण्यात येणाऱ्या बंद मध्ये सातारा जिल्ह्यातील अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वकाही बंद राहणार आहे. हा बंद अगदी शांततेत पार पाडावा असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केले आहे.
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील खंडाळी पाटीजवळ मराठा आंदोलकांनी जाळपोळ केली आहे. सोलापूर - पुणे महामार्गांवर टायर जाळून मराठा आंदोलकांनी महामार्ग अडविला होता. सोलापूर - पुणे महामार्ग अडवल्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. तसेच पिंपरी चिंचवडहून पंढरपूरला निघालेली बस जाळण्यात आली आहे. या बसमधील प्रवाशांना खाली उतरविण्यात आले होते, यानंतर बसला आग लावण्यात आली.