मीरारोड, दि. 13 - दिल्लीच्या एका महिलेने मीरारोड येथे विक्री केलेल्या 11 व 3 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. सदर मुलींना भविष्यात वेश्याव्यवसायास लावण्या करीता खरेदी केल्याचे समोर आले असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. लहान मुलींचे अपहरण करून विक्री करणारी आंतरराज्य टोळी असल्याचे ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ महेश पाटील यांनी म्हटले आहे.
एका संस्थेच्या माध्यमातून पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे सपोनि संजय बांगर यांनी पथकासह मीरा रोड च्या सृष्टी वसाहतीतील कल्पतरू इमारतीतील सदनिकेवर छापा टाकला. त्यावेळी तेथे अमृतसर येथून वर्षभरा आधी अपहरण करून आणलेली 11 वर्षांची मुलगी सापडली. पोलिसांनी या प्रकरणी गपचू उर्फ भाग्यकुमार प्रेमकुमार राज (49), त्याची बहीण दीपा (40) व प्रमोदकुमार राज (42) यांना अटक केली. चौकशीत सदर मुलगी प्रमोदकुमार सह गपचू चा भाऊ नंदू (38) यांच्या मध्यस्थीने दिल्लीच्या एका महिले कडून 1 लाख रुपयांना खरेदी केल्याचे समजले.
दिल्ली च्या महिलेकडून आणखी एक 3 वर्षाची मुलगी 75 हजार रुपयांना खरेदी केल्याचे प्रमोदकुमार याने माहिती देताच पोलिसांनी शांती पार्क येथील सदनिकेतून त्या 3 वर्षांच्या मुलीची सुटका केली. तेथून पोलिसांनी नंदू सह पिंकी राज या दोघांना अटक केली आहे.
अटक आरोपी मूळचे राजस्थानचे असून त्यांना 23 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सदरची टोळी दिल्ली, राजस्थान, पंजाब , महाराष्ट्र , बंगळुरू आदी ठिकाणी कार्यरत असून आणखी मुलींची देखील खरेदी विक्री झाल्याची शक्यता डॉ पाटील यांनी वर्तवली आहे.
सुत्रधार आरोपी महिलेचा शोध सुरू आहे. अटक आरोपींची चौकशी केली जात असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांनी सांगितले. अल्पवयीन मुली खरेदी करून त्यांना वेश्याव्यवसायासाठी लावून बक्कळ पैसे कमावण्याचा आरोपींचा गैरधंदा आहे. गपचूने स्वतः च्या मुलीस पण दुबई येथे वेश्यावसाय साठी पाठवल्याचे समोर आले आहे.