ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 14 - गेल्या दीड वर्षभरातून प्रभारी असलेल्या शिवाजी विद्यापीठातील कुलसचिव पदासाठी उद्या, मंगळवारी मुलाखतीची प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेअंतर्गत १७ उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत.
कुलसचिव पदासाठीची निवड प्रक्रिया विद्यापीठाने दि. २७ मेपासून सुरू केली आहे. त्याअंतर्गत प्रशासनाने दि. १६ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्यानुसार ५० जणांनी अर्ज दाखल केले. या ऑनलाइन अर्जाची प्रत विद्यापीठ कार्यालयात जमा करावयाची मुदत दि. २१ जूनपर्यंत होती. या मुदतीपर्यंत आणि वेळेत २८ जणांचे अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले. या अर्जांच्या छाननीतून मुलाखतीच्या प्रक्रियेसाठी १७ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यामध्ये किशोर माने, राजसिंग चव्हाण, सयाजीराजे मोकाशी, भारतभूषण कांबळे, भारत पाटील, जयंत देशमुख, सर्जेराव शिंदे, सुनील मिरगणे, गोविंद कोळेकर, संजय माळी, संजयकुमार गायकवाड, शरद फुलारी, धनंजय माने, मिलिंद गोडबोले, यशवंत कोळेकर, पंढरीनाथ पवार, विलास नांदवडेकर यांचा समावेश आहे. या पात्र उमेदवारांना मुलाखतीची वेळ, ठिकाण आदींची माहिती ई-मेल आणि पत्राद्वारे दिली असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. डी. आर. मोरे यांनी दिली.
ते म्हणाले, मुलाखती मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या हॉलमध्ये होणार आहेत. कुलगुरू अध्यक्ष असणाºया सात सदस्यीय असलेल्या कुलसचिव निवड समितीतर्फे या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. मुलाखतीच्या प्रक्रियेनंतर सायंकाळी निवड झालेल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येईल.