पुणे : शहरात होणारे कार्यक्रम महापालिकेने मला विचारून घेण्यात यावेत, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी नगरविकास विभागाला दिलेले पत्र म्हणजे संस्थात्मक स्वायत्ततेवर आक्रमण आहे. महापालिकेच्या सभागृहाचे सदस्य राहिलेल्या गिरीश बापट यांनी अशा प्रकारचे पत्र पाठविणे म्हणजे पालिकेच्या सभागृहाविषयी अनास्था दाखविणे होय, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे नगरसेवक अभय छाजेड यांनी गिरीश बापट यांच्यावर टीका केली.नवी मुंबई महापालिकेने तुकाराम मुंढेविरुद्ध बहुमताने अविश्वास ठराव मंजूर केला असतानाही मुख्यमंत्र्यांनी मुंढे यांची बदली केली नाही. त्याच वेळी गिरीश बापट नगरविकास विभागाला पत्र पाठवून महापालिकेचे कार्यक्रम मला विचारून व्हावेत, अशी मागणी करतात. याचा अर्थ सरकार कायद्याच्या चौकटीत काम करायला तयार नाही, असा होतो. महापालिकेच्या स्वायत्ततेवर यामुळे आक्रमण होत आहे. पालकमंत्र्यांना सत्तेची धुंदी चढल्यासारखे वाटत आहे, अशी टीका छाजेड यांनी केली.गिरीश बापट यांनी नगरविकास विभागाला पाठविलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे नगरसचिव सुनील पारखी व राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांना मुंबईला बोलावून घेऊन स्पष्टीकरण घेण्यात आले. मात्र, शासनाच्या प्रोटोकॉलचे पालन झाले असल्याचे स्पष्ट झाल्याने पालिकेला क्लिन चिट देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पालिकेचे स्वायत्ततेवर आक्रमण
By admin | Published: November 04, 2016 1:06 AM