नवी मुंबई : कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी नाकारली तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा आमदार विलास पाटील उंडाळकर यांनी केली. एपीएमसी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. जिल्ह्यात काँग्रेसचे आपण एकमेव उमेदवार असतानाही पक्षातून गळचेपी होत असल्याची खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली. कराड दक्षिण मतदारसंघातून यंदा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभा लढवण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार विलास पाटील उंडाळकर यांना उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. परंतु पक्षाने जरी आपली उमेदवारी नाकारली तरी आपण जनतेसाठी निवडणूक रिंगणात उतरू, अशी ग्वाही उंडाळकर यांनी कराड दक्षिण मतदारसंघातील मतदारांना दिली. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काँग्रेसने सतत आपली गळचेपी करण्याचा प्रयत्न केल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सातारा जिल्ह्यात काँग्रेसचे आपण एकमेव आमदार आहोत तरीही आपल्याला डावलण्याचा होत असलेला प्रयत्न ही असुरी प्रवृत्ती असल्याचेही ते म्हणाले. कराड दक्षिण मतदारसंघ हा विकासाचा रोल मॉडल असून, तेथे दलालांना थारा नसल्याचेही त्यांनी सांगितले. तर आपण सत्ता ही जनतेसाठी समर्पित केली असल्याचेही ते म्हणाले. आमदार विलास पाटील उंडाळकर हे गेली ३५ वर्षे आमदार असल्याने त्यांना पक्ष उमेदवारी नाकारणार नाही अशी शक्यता उंडाळकर यांचे समर्थक धनाजी काटकर यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांना उमेदवारी दिली तरी उंडाळकर हे रिंगणात उतरतील व निवडूनही येतील, असा विश्वास काटकर यांनी व्यक्त केला आहे. मी उंडाळकरांना मदत करेन, असे नरेंद्र पाटील यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांविरोधात उंडाळकर रिंगणात
By admin | Published: September 15, 2014 4:21 AM