मुंबई : वाहतूक पोलीस भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीवर देखरेख करण्याचे निर्देश सोमवारी उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अपर महासंचालकांना दिले. सध्या वरळीच्या शस्त्रास्त्र विभागात काम करणाऱ्या हेड कॉन्स्टेबलेने याचिकेद्वारे वाहतूक विभागाचा भ्रष्ट कारभार न्यायालयात उघड केला आहे. वाहतूक विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध हेड कॉन्स्टेबल सुनील टोके यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भ्रष्टाचारी पोलिसांवर कारवाई करण्यात यावी व खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी टोके यांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती.सोमवारच्या सुनावणीत सरकारी वकील जयेश याज्ञिक यांनी टोके यांच्या तक्रारीनंतर, एसीबीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्या देखरेखीखाली चौकशी करण्यास सुरुवात झाली असल्याचे खंडपीठाला सांगितले, परंतु आरोप गंभीर स्वरूपाचे असून, याचिकाकर्त्याने केलेले आरोप केवळ मुंबईपुरतेच मर्यादित नसल्याने, एसीबीच्या अपर महासंचालकांच्या देखरेखीखाली चौकशी करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.‘सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचा निर्देश आम्ही अपर महासंचालकांना (एसीबी) देत आहोत,’असे खंडपीठाने म्हटले. सध्या वरळीच्या शस्त्रास्त्र विभागात काम करणारे २०१३ ते २०१६ पर्यंत गोरेगाव वाहतूक विभाग व त्यानंतर वडाळा वाहतूक विभागात काम केलेल्या सुनील टोके यांनी याचिकेद्वारे वाहतूक विभागाचे पितळ उघडे पाडले आहे.वाहतूक विभागात होत असलेला भ्रष्टाचार पाहून आपल्यालाही धक्का बसल्याचे टोके यांनी सांगितले. पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे उदाहरण देताना टोके यांनी पोलिसांच्या वाहनांमागील दराबाबतही माहिती याचिकेत दिली आहे. ‘बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा ट्रक, जकात चुकवणाऱ्या ट्रकलाही पोलीस लाच घेऊन सोडून देतात, तसेच बांधकामाचे साहित्य भरलेला ट्रक बेकायदेशीरपणे पार्क करण्यात आला असल्यास पोलीस त्यांच्याकडूनही स्वीकारून सोडतात. एवढेच नाही, तर एखादा मद्यधुंद अवस्थेतही गाडी चालवत असल्यास त्यालाही पैसे घेऊन सोडण्यात येते,’ असे टोके यांनी याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)
भ्रष्टाचाराची चौकशी करा
By admin | Published: January 24, 2017 4:33 AM