मुंबई : राज्याच्या वन विभागातील १९० कर्मचारी, अधिकारी यांची चौकशी प्रलंबित असून, काहींची चौकशी तीन वर्षे व त्यापेक्षा अधिक काळ प्रलंबित आहे. चौकशीची ही सर्व प्रकरणे नोव्हेंबरपर्यंत निकाली काढण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.राज्य सरकारच्या सेवेतील सुमारे ३ हजार कर्मचारी व अधिकारी निलंबित असून, त्यांच्या वेतनावर दरवर्षी सरकार १०० कोटी रुपये खर्च करीत आहे. मुनगंटीवार यांनी वन विभागातील निलंबित कर्मचारी व अधिकाऱ्यांचा आढावा घेतला असता ही संख्या १९० असल्याचे उघड झाले. गेली तीन वर्षे अधिकारी निलंबित असून, त्यांची चौकशी सुुरू आहे ही गंभीर बाब असून, यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याने सर्व प्रकरणे नोव्हेंबर महिन्यापर्यंत म्हणजे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी निकाली काढण्यास त्यांनी सांगितले. नगरविकास व अन्य काही खात्यांमध्ये निलंबित होऊन खातेनिहाय चौकशी सुरू असल्याची प्रकरणे ११ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)
वनाधिकाऱ्यांची नोव्हेंबरपर्यंत चौकशी करा - मुनगंटीवार
By admin | Published: July 10, 2015 2:14 AM