ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 – मुंबईत पावसाला सुरुवात होताच गेले काही दिवस रेल्वेची उपनगरीय सेवा विविध कारणास्तव विस्कळीत होत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. याप्रकरणी तात्काळ मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची आज दिल्ली येथे जाऊन भेट घेतली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू एकीकडे प्रवाशांच्या सेवेचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करीत असताना रेल्व्ेा प्रशासनाच्या चुकांमुळे, अधिका-यांच्या दिरंगाईमुळे जर प्रवाशांचे हाल होत असतील तर अशा अधिका-यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली.
रेल्वेने प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. तरीही पावसाला सुरुवात होतानाच हलक्याशा पावसाने गेले दोन दिवस रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते . रेल्वे अधिकारी जरी कामे केली असे सांगत असले तरी प्रत्यक्षात प्रवाशांचेही हाल होत आहेत.
काल मध्य प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. जे. जे. हॉस्पिटलकडे निघालेल्या एका माहिलेची प्रसूतीही रेल्वे गाडीतच झाली. तर माहीम रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या विद्युत उपकेंद्रातील बॅटरी बॉक्स चोरीला गेल्याचा फटका आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसला. त्यामुळेही प्रवाशांचे हाल झाले. तसेच गेल्या आठवडाभरात हार्बर आणि मध्य रेल्वेच्या ओव्हरहेड वायर तुटल्याचे प्रसंग वारंवार घडत असून तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेचा वारंवार खोळंबा होत आहे.
या प्रकरणी आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी तात्काळ दिल्ली येथे जाऊन रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणी चौकशी करावी. तसेच रेल्वे अधिका-यांना पावसाळ्यात आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देश देण्यात यावेत. ज्या ठिकाणी दरड कोसळणे किंवा पाणी साचण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी खरबदारीच्या उपायोजना करण्यात याव्यात, तसेच आप्त्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रवशांना वेळीच सूचना देण्यात याव्यात. काही उपनगरीय रेल्वे स्टेशनवर फलाटांच्या दुरुस्तीची व ब्रिजची कामे सुरू आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करावीत. तर संपूर्ण मान्सून पूर्व तयारीचा रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांनी फेरआढावा घेऊन त्याचा अहवाल रेल्वे मंत्रालयाने मागवून घ्यावा. त्यानंतरही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला तर त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिका-यांची चौकशी करून कारवाई करावी, अशा विविध मागण्या करीत रेल्वेमंत्र्यांशी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत चर्चा केली.