मुंबई : उद्याेगपती अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणी सचिन वाझे यांच्यासोबत युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांचीही चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) करावी, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. वाझे यांनी आयपीएलमध्ये बेटिंग करणाऱ्या टोळ्यांकडून खंडणी मागितली होती. या खंडणीत सरदेसाई यांनी हिस्सा मागितल्याचा आरोपही राणे यांनी सोमवारी केला. (Investigate Varun Sardesai along with vazen; Asked for share in IPL betting team's ransom, alleged Nitesh Rane)भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बेटिंगचे रॅकेट चालते. या सर्व बेटिंगवाल्यांना सचिन वाझे यांनी फोन करून मोठ्या खंडणीची मागणी केली होती. छापा किंवा अटक टाळायची असेल तर १५० कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी वाझेंनी केली होती. वाझेंनी बेटिंगवाल्यांना फोन केल्यानंतर वाझेंना वरुण सरदेसाई यांनी फोन केला. तुम्ही बुकींकडे जे पैसे मागितले त्यातील आमचा हिस्सा किती? असे सरदेसाई यांनी वाझे यांना विचारल्याचा म्हणजे एक प्रकारे खंडणी मागितल्याचा आरोप राणे यांनी केला. त्यामुळे एनआयएने वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यात झालेले कॉल रेकॉर्ड, त्यांचे संभाषण आणि सीडीआर तपासावे, अशी मागणी राणे यांनी केली.आपल्या नातेवाइकाला वाचविण्यासाठी मुख्यमंत्री वाझेंना पाठीशी घालत आहेत का, असा प्रश्न करतानाच ठाकरे सरकारने कोणत्याच घटनात्मक पदावर नसलेल्या सरदेसाई यांना वायप्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली, असे राणे यावेळी म्हणााले. शासकीय बैठकांनाही ते उपस्थित असतात. अनेक अधिकाऱ्यांना ते थेट दूरध्वनी करतात. अशा सरदेसाईंनी वाझे यांच्याशी कोणत्या कारणासाठी किती वेळा संपर्क साधला याचीही चौकशी एनआयएने करावी, तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून सत्यय जनतेसमाेर आणायला हवे, असे राणे म्हणाले.
‘त्या’ समितीत काेण हाेते, याची माहिती द्यावी!- न्यायालयाच्या निर्णयानंतर निलंबित झालेल्या वाझेंना जूनमध्ये कोरोना काळात कमी मनुष्यबळाचे कारण देत पुन्हा सेवेत घेण्यात आले, याची आठवण राणे यांनी यावेळी करुन दिली. कमी मनुष्यबळ दाखवून इतरांऐवजी वाझे यांनाच पुन्हा सेवेत घेण्याची एवढी गरज काय हाेती, असा प्रश्नही राणे यांनी यावेळी उपस्थित केला.- त्यामुळेच आधीच आपल्या कारकिर्दीत वादग्रस्त ठरलेल्या वाझे यांना सेवेत पुन्हा का घेण्यात आले, असा प्रश्न उपस्थित हाेते, असे राणे म्हणाले. त्यांना सेवेत घ्यावे यासाठी त्यांच्या नावाची शिफारस काेणी केली? ही शिफारस करणाऱ्या समितीत कोण-कोण होते याची माहिती जाहीर होणे आवश्यक आहे, अशी मागणीही राणे यांनी केली.