ऑनलाईन लोकमत /
कवठे (सातारा), दि. : आई-वडिलांची मानसिक त्रासापासून सुटका करण्यासाठी देवाकडे कौल लावतो असे सांगून पैशांची मागणी करणारे पाच देवऋषी अर्थात पुजारी भुईंज पोलिसांनी सुरुर येथे रविवारी ताब्यात घेतले.
याबाबत माहिती अशी की, सुरुर येथील सुप्रसिद्ध दावजी पाटील मंदिरात भानामती अन करणीच्या नावाखाली बुवाबाजीचा बाजारच भरत असल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आली होती. त्यानुसार 'अंनिस'तर्फे एक बनावट भक्त पाठविण्यात आला. त्याच्या आई-वडिलांची मानसिक त्रासातून मुक्तता व्हावी, अशी विनंती त्याने केल्यानंतर संबंधित पुजा-यांनी पैशाची मागणी केली. तसेच आजार दूर करण्यासाठी देवास कौल लावतो, असेही सांगितले.
याप्रकरणी भुईंज पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सुरुवातीला तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर अजून दोघे सापडले. त्यांच्याकडून काळ्या बाहुल्या, रोख रक्कम, लिंबं आदि वस्तू पोलिसांनी जप्त केल्या. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली.
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी 'अंनिस'चे राज्य सचिव प्रशांत पोतदार, बुवाबाजी संघर्ष सचिव भगवान रणदिवे, आरीफ मुल्ला,धर्मराज माने,सुनिल रणदीवे आदी कार्यकर्त्यांनी मोहिमेत सहभाग घेतला.