मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर माधव पाटणकर यांच्याशी संबंधित फसवणूक प्रकरणाचा तपास बंद करण्यास विशेष न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिली.
युनियन बँक ऑफ इंडियाचे अधिकारी, ज्वेलर्स आणि पुष्पक बुलियन प्रा. लि. या सराफा ट्रेडिंग कंपनीचे संचालक यांच्यावर ८४.६ कोटी रुपयांची फसवणूक आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फसवणूक केलेल्या रकमेतील काही रक्कम पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि.कडे वळते केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांसंदर्भातील ‘क्लोजर रिपोर्ट’ केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने स्वीकारला आहे. विशेष म्हणजे, हा अहवाल सादर करण्याला ईडीचा विरोध होता. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपींवर खटला चालवण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केले.
सीबीआयचा तपास सदोष - ईडी ८४.६ कोटी रुपयांच्या रद्द केलेल्या नोटा बँकेत जमा केल्याचा आरोप आहे. या नोटा दागिने खरेदी-विक्रीतून मिळाल्याचे आरोपींचे म्हणणे आहे. मात्र, ईडीच्या दाव्यानुसार, पुष्पक कंपनीने श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि.च्या खात्यात पैसे वळविले. त्या पैशांचा वापर ठाण्यातील नीलांबरी इमारतीतील ११ फ्लॅट खरेदीसाठी केला गेला. श्री साईबाबा गृहनिर्मितीची मालकी व नियंत्रण पाटणकरांकडे आहे. क्लोजर रिपोर्टला विरोध करताना ईडीने सीबीआय तपास सदोष असल्याचे म्हटले.