नागपूर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरअंतर्गत रायगड जिल्ह्यातील रोहा-माणगाव, पाणसई व वावे दिवसाळी औद्योगिक क्षेत्रात करण्यात आलेले जमीन अधिग्रहण चुकीचे झाले असेल तर याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली. जमीन अधिग्रहण सलग भागात झाले तरच विकास शक्य आहे. जमीनमालकांच्या संमतीने जमीन अधिग्रहण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या भागातील औद्योगिकीकरणाला शिवसेना नेत्यांनी निवडणुकीपूर्वी विरोध दर्शविला होता. त्यामुळे सत्तेवर आल्यानंतर शिवसेनेची भूमिका बदलली का, असा प्रश्न सदस्य सुनील तटकरे यांनी केला. जमीन अधिग्रहण चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. उद्योगमंत्री सहमतीने जमीन अधिग्रहण करू, असे म्हणत आहेत. परंतु शेतकरी जमीन अधिग्रहणाला विरोध करीत असेल तर सक्तीने अधिग्रहण करण्याचे निर्देश प्रधान सचिवांनी दिल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणले. शेतकऱ्यांकडून कमी दराने अधिग्रहण केलेली जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कंपन्यांना जादा दराने दिल्याचे त्यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील जमीन अधिग्रहणाची चौकशी
By admin | Published: December 23, 2015 1:51 AM