ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ : बांग्लादेशातील हल्ल्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या डॉ. झाकीर नाईक यांच्या कार्यालयाबाहेर रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी निदर्शने केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवून परिस्थितीवर नियंत्रण आणले. मुस्लीम तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करणाऱ्या झाकीर नाईकच्या भाषणांची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना दिले आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली.
ढाकामधील एका हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यातील अतिरेक्याने आपल्याला झाकीर नाईकच्या भाषणातून प्रेरणा मिळाल्याचे चौकशीत सांगितले. तेव्हापासून नाईक हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले. त्यामुळे झाकीर नाईकची चौकशी करुन त्यावर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
नाईक यांच्या चौकशीचे आदेश मिळताच गुरुवारी त्यांच्या डोंगरी येथील इस्लामिक रीसर्च फाऊण्डेशनच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली. गुरुवारी सकाळी इदचे नमान पठन झाल्यानंतर रझा अकादमीच्या सदस्यांनी डॉ. नाईकच्या कार्यालयाबाहेर हिरव्या रिबीनी बांधत घोषणाबाजी केली. डॉ. नाईक यांच्या भाषणामुळे तरुण कट्टरवादाकडे वळत असल्याचा आरोप अकादमीने केला. त्यामुळे दिवसभर येथील कार्यालय बंद होते.
झाकीर नाईक स्वत:ला मुस्लीम स्कॉलर समजतो. इतकेच नाही, तर देशभरात तरुणांची शिबिरे घेऊन ते कट्टरवादासाठी त्यांना प्रेरीत करतो. यूट्यूब, फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंगवर साइटवर नाईकचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे याची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. शिवाय या डॉ. नाईकच्या संस्थेला आर्थिक सहाय्य कोठून होते, त्याचे उद्दिष्टे काय? हे देखील तपासणे गरजेचे े असल्याचे रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.