पारनेर(अहमदनगर) : निघोज येथे दारुबंदीसाठी नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलनातील महिलांवरील लाठीमार व मारहाण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी दिले आहेत. कर्जत पोलीस उपअधीक्षक विजय लगारे यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे़ निघोज दारूबंदी समितीने सोमवारी दुपारी निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील व पोलीस अधीक्षक त्रिपाठी यांची भेट घेतली़ दारूबंदीप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग औरंगाबाद खंडपीठात आपले म्हणणे सादर करणार असल्याचे पाटील म्हणाले.विधानसभेत चर्चानिघोज दारुबंदीचा विषय सोमवारी विधानसभेत चांगलाच गाजला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. विखे म्हणाले, मतदानात काही शासकीय अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करून दारुबंदी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. फेरमतदान घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही पुन्हा निवडणूक झालेली नाही. लाठीमार करणाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी विखे यांनी केली. (प्रतिनिधी)
महिलांवरील लाठीमाराची चौकशी
By admin | Published: March 15, 2016 1:49 AM