पिंपरी : पंचशील ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अजय ईश्वरदास चोरडिया यांच्या आत्महत्येच्या घटनेस चार दिवस उलटले, तरी अद्याप गूढ उकललेले नाही. ‘तपास सुरू आहे’ एवढेच अधिकृत उत्तर पोलिसांकडून मिळत आहे. गुरुवारी महापालिका आयुक्त कक्ष, बांधकाम परवाना विभाग आणि डबल ट्री हॉटेलमधील कर्मचा:यांची पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रंनी दिली.
चोरडिया यांच्याजवळ सुसाईड नोट मिळूनही आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. चोरडिया कुटुंबियांचे जबाब नोंदविण्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. आशिष शर्मा हा धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, अधिकृतपणो याबाबत माहिती दिलेली नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आयुक्त कक्ष, बांधकाम परवाना विभागात गुरुवारी पोलीस पथक आले होते. चोरडिया हे व्यावसायिक असल्याने महापालिकेशी संबंधित काही कामे होती का किंवा प्रकल्पासंदर्भात बांधकाम विभागाशी काही संबंध होता का, याचीही चाचपणी पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)
चोरडिया कुटुंबीयांच्या घरी विविध विधी सुरू आहेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदविता आलेले नाहीत. लवकरच ते नोंदविले जातील.
- बी. मुदीराज,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
चिठ्ठीतील हस्ताक्षर तपासणीसाठीचा अहवाल अजूनही मिळालेला नाही. मात्र, आज चिंचवड स्टेशन येथील डबल ट्री हिल्टन हॉटेलमध्ये पोलिसांचे पथक गेले होते. त्यांनी कर्मचा:यांचे जबाब घेतले आहेत.
- डॉ. राजेंद्र माने,
पोलीस उपआयुक्त, परिमंडळ 3