सावंतवाडी, दि. 5 - आंबोली घाटातील कावळेसाद पॉईंट येथे सोमवारी संध्याकाळी दारुच्या अमलाखाली स्टंटबाजी करताना दोन युवकांचा खोल दरीत पडून मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी तिथे अनेकजण उपस्थित होते. त्यांनी या संपूर्ण घटनेचे मोबाईलवर शूटिंगही केले. आता राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शूटिंग करणा-यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
शनिवारी सायंकाळी त्यांनी कावळेसाद पॉईट येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. आपत्कालीन विभागाबाबत त्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान दोन्ही युवकांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळी गडहिंग्लज येथील पोल्ट्रीत काम करणारे सात जण आंबोली-कावळेसाद येथे फिरायला आले होते. त्यातील दोघे जण मद्यधुंद अवस्थेत मौजमजा करीत असताना खोल दरीत कोसळले.
त्यानंतर चार दिवस कोल्हापूर व आंबोलीसह सांगेली येथील शोध पथके या युवकांचा शोध घेत होती. पण त्यांना यश येत नव्हते. त्यातच गुरूवारी ( 3 ऑगस्ट ) सायंकाळी कोल्हापूर येथील शोधपथक निघून गेले. त्यानंतर शुक्रवारी ( 4 ऑगस्ट ) सकाळी सांगेली येथील बाबल आल्मेडा व आंबोलीतील किरण नार्वेकर यांनी शोधमोहीम सुरू केली होती.
दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास प्रताप उजगरे याचा मृतदेह खोल दरीच्या पायथ्याला असल्याचा दिसला. त्या मृतदेहापर्यत किरण नार्वेकर व दाजी माळकर पोचले त्यांनी या मृतदेहाला रोप वेच्या साहय्याने बांधले त्यानंतर रोप वे वर ओढून घेण्यात आला. 3 वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह वर काढण्यात शोधपथकासह अन्य साथीदारांना यश आले.
गडहिंग्लज येथील इम्रान गारदी याच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न पथकाने घेतला. पण दाट धुके तसेच पावसाचा प्रवाह मोठा असल्याने त्यात अनेक अडचणी येत असल्याने ही शोधमोहीम सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास थांबविण्यात आली आहे. शनिवारी पुन्हा सुरू करण्यात आलेल्या शोधमोहीमदरम्यान इम्रान गारदीचा मृतदेह पथकाला सापडला.
पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी आंबोली कावळेसाद पॉईंट येथील खोल दरीत कोसळलेल्या दोन युवकांचे मृतदेह मिळाल्यानंतर शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिक्षातकुमार गेडाम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच पर्यटकांनी धबधब्यावर येतना सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे. दारू पिऊन धिंगाणा घालणा-यांवर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील तसेच जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे असे पोलीस अधीक्षक डॉ दीक्षांतकुमार गेडाम यांनी सांगितले.