सावंतवाडी : राज्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून युती शासन रेल्वेत पाच वर्षांत दहा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. आतापर्यंत राज्यातील चार रेल्वेमार्गांना मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच मागील सरकारच्या घोषणा प्रत्यक्षात उतरविण्याचे काम आम्ही करीत असल्याचा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना हाणला.सावंतवाडी टर्मिनसच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री फडणवीस मळगाव येथे आले होते. यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, सावंतवाडी टर्मिनसचे स्वप्न हे फक्त सुरेश प्रभू यांच्यामुळे साकार झाले. राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात चार नवीन रेल्वेमार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. बंदर विकासाने रेल्वेला समृद्धी येऊ शकते. त्यासाठीच सरकार रेल्वेत दहा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. यापूर्वीचे सरकार रेल्वे हे केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याचे म्हणत असल्याने वर्षानुवर्षे प्रकल्प तसेच पडून होते; पण आता तसे होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. चिपी विमानतळाबाबत गैरसमज पसरविण्यात येत आहे; पण काही केले तरी येत्या दोन वर्षांत हे विमानतळ पूर्ण होईल. चिपी विमानतळ हे गोव्याच्या तोडीचे करण्यात येणार आहे. अनेक विमाने येथे उतरणार असून, तशी व्यवस्था राज्य सरकार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक जिल्ह्यात मॉल उभारून त्यात प्रत्येक तालुक्याच्या बचतगटाचा माल ठेवून त्याची विक्री करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)मागील सरकारने काय केले?सिंधुदुर्ग जिल्ह्यात सी-वर्ल्ड प्रकल्प होणार असून, हा प्रकल्प अनेकांना रोजगार देणारा आहे. तो होणारच. कोणी कितीही अफवा पसरविल्या तरी त्याचा उपयोग होणार नाही. मागील सरकारने १५ वर्षांत काहीच केले नाही. त्यामुळे आम्हाला हे करावे लागत आहे, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी नारायण राणे यांना लगावला.
रेल्वेत पाच वर्षांत दहा हजार कोटींची गुंतवणूक
By admin | Published: June 28, 2015 2:04 AM