मुंबई : डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनात जगात अव्वल मानली जाणारी फॉक्सकॉन ही कंपनी येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात तब्बल ३५ हजार कोटी रुपयांची (पाच अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे. यासंबंधीच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांच्या उपस्थितीत शनिवारी स्वाक्षरी झाली. राज्यातील ही आजवरची एकाचवेळी होत असलेली सर्वांत मोठी गुंतवणूक असेल. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन, संशोधन आणि विकास हे कार्य या प्रकल्पात होईल. या ठिकाणी ५० हजार नवे रोजगार उपलब्ध होणार आहेत. मुंबई-पुणे मार्गावर किंवा तळेगावनजीक (जि. पुणे) हा प्रकल्प उभारला जाईल. दोन्ही ठिकाणी कंपनीने पाहणी केली असून, जागेची निश्चिती लवकरच केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले ‘मेक इन इंडिया’चे आणि आम्ही त्यास अनुसरून सुरू केलेले ‘मेक इन महाराष्ट्र’चे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे ते म्हणाले. वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये झालेल्या सामंजस्य करारप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, अतिरीक्त मुख्य सचिव (वित्त) सुधीर श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, उद्योग सचिव अपूर्व चंद्र, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)आयफोन, आयपॅडची निर्मिती...अॅपल कंपनीची आयपॅड आणि आयफोन ही उत्पादने तसेच अन्य नामवंत कंपन्यांसाठी मोबाईल, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करणारी फॉक्सकॉन ही नामवंत कंपनी आहे. तीत १० लाख लोक काम करतात. १९७४ साली तैवानमध्ये नोंदणी झालेल्या या कंपनीने १९८८ पासून चीनमध्ये गुंतवणूक सुरू केली. फॉर्चुनने २०१४ मध्ये जाहीर केलेल्या जगातील सर्वोत्तम ५०० कंपन्यांमध्ये फॉक्सकॉनला ३२ वे नामांकन प्राप्त झाले होते. फॉक्सकॉनच्या समुहात १४ अन्य कंपन्या आहेत. गुंतवणुकीचा आकडा खरा की फुगविलेला?तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी आपल्या मुलाखतीमध्ये भारतात १० वर्षांत २ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा मानस व्यक्त केला होता. गाऊ यांची ती मुलाखत खरी मानायची की ही कंपनी येत्या ५ वर्षांत एकट्या महाराष्ट्रात ५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे खरे मानायचे, असा खोचक सवाल माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.
३५ हजार कोटींची राज्यात गुंतवणूक
By admin | Published: August 09, 2015 4:08 AM