सांगोला (जि. सोलापूर) : गुंतवणुकीवर आकर्षक व्याजाचा परतावा व खुले प्लॉट देण्याचे आमिष दाखवून एजंट व ग्राहकांची सुमारे ८० लाख २० हजार ७६० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील रिलायबल फोर्स इन्फ्रा अॅग्रो कंपनीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीने लकी ड्रॉ योजनेद्वारे शेकडो ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचेही तपासातून पुढे आले आहे. मोहन विष्णू राऊत, विष्णू भीमराव राऊत, (रा. बनकरवाडी, सांगोला), संदीप बाजीराव आदलिंंगे, सुभाष बाजीराव आदलिंंगे, माया संदीप आदलिंगे (रा. सर्व कमलापूर, ता.सांगोला) व हनुमंत नारायण शेंबडे (इसबावी, ता. पंढरपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या कंपनीच्या संचालकांची नावे आहेत.बनकरवाडी येथील मोहन विष्णू राऊत याने २८ एप्रिल २०१३ मध्ये रिलायबल फोर्स इन्फ्रा अॅग्रो या नावाने सांगोल्यातील फुले कॉम्प्लेक्स याठिकाणी कार्यालय सुरु केले़ राऊत यांनी कंपनीकडे गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकात जवळपास ३०० एजंटांची नेमणूक केली़ या एजंटांमार्फत कंपनीने जून २०१३ ते जानेवारी २०१५ या कालावधीत हजारो ग्राहकांकडून १०० च्या पटीत ५ लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर १६ टक्के व्याज व खुले प्लॉट नावावर करण्याचे आमिष दाखवून सुमारे ८० लाख २० हजार ७६० रु.च्या ठेवी जमा केल्या. त्यानंतर परतावा देण्याची वेळ आल्यावर कार्यालय बंद करुन पोबारा केल्याचे हलकुरकी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान राऊत याने सांगोल्यात लकी ड्रॉच्या माध्यमातून मोठ्या बक्षीसांचे आमिष दाखवून हजार रुपयांच्या पटीने लाखो रुपये जमा करून त्यांनाही बक्षीसाचे वाटप केले नसल्याचे तपासातून पुढे आले आहे. (वार्ताहर)
गुंतवणूकदारांची ८० लाखांची फसवणूक
By admin | Published: January 25, 2017 3:34 AM