मुंबई - छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रातील अनेक गडकोट किल्ले स्वराज्यात जिंकलेले आपण ऐकलं आहे. मात्र एक असा किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर संभाजी महाराज, ब्रिटीश, मुघल, पोर्तुगीज कोणालाच जिंकता आला नाही. हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड किनारपट्टी गावात आहे, जो मुरुड जंजिरा किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला समुद्रसपाटीपासून ९० फूट उंचीवर बांधण्यात आला आहे. विशेष गोष्ट म्हणजे किल्ल्याच्या चहूबाजूला अरबी समुद्राने वेढलं आहे.
मुरुड जंजिरा हा किल्ला समुद्राच्या लाटांमध्ये भक्कमपणे उभं राहून अनेक आक्रमणांना सामोरं गेला आहे. या किल्ल्याबाबत अनेक रहस्य आहेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील हा एकमेव किल्ला आहे जो कधीही जिंकता आला नाही. हा किल्ला जिंकण्यासाठी ब्रिटीश, पोर्तुगीज, मुघल, छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, चिमाजी आप्पा आणि संभाजी महाराज यांनी खूप प्रयत्न केले होते पण त्यांना यश आलं नाही. त्यामुळे हा जंजिरा किल्ला नेहमी अंजिक्य राहिला.
मुरुड जंजिरा किल्ल्याचा मुख्य दरवाजा किल्ल्याच्या काही मीटर अंतरावर गेल्यावरच दिसू शकतो अशाप्रकारे बांधण्यात आला आहे. त्यामुळे शत्रूला या किल्ल्यात प्रवेश करणं आव्हानात्मक असायचे.
१५ व्या शतकात अहमदनगरच्या सल्तनीत मलिक अंबरच्या देखरेखीमध्ये किल्ल्याचं बांधकाम झालं. मुरुड समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हा किल्ला बांधण्यात आला आहे. त्याची तटबंदी ४० फुट उंच आहे व किल्ला बावीस एकर जमिनीवर पसरला आहे. किल्ल्याचे बुरुज गोलाकार असून अजूनही बुलंद स्थितीत आहेत. हा किल्ला पंच पीर पंजतन शाह बाबांच्या संरक्षणाखाली असल्याचे मानले जाते. शाह बाबांची थडगीही या किल्ल्यात आहे.
भक्कम बांधकाम आणि समुद्र या शिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या ५७२ तोफा ह्या मुळेच जंजिरा अभेद्य होता. आजही अनेक तोफा किल्ल्यावर आढळून येतात. १६६९ मध्ये स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्याची मोहिम आखली होती. मात्र हा किल्ला राजांना जिंकता आला नाही. असा हा अजिंक्य किल्ला ३ एप्रिल, १९४८ रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाला.