मुंबई : आयफोन, आयपॅड यासारखी अॅपलची उत्पादने बाजारात आणणाऱ्या फॉक्सकॉन या अांतरराष्ट्रीय कंपनीने महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करण्याची तयारी दाखवली असून, या कंपनीचे प्रतिनिधी मंडळ येथे आल्यास सुयोग्य जागा व करसवलतीचे पॅकेज देण्याची तयारी उद्योग विभागाने ठेवली असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.देसाई यांनी सांगितले की, अॅपलची अनेक उत्पादने फॉक्सकॉन कंपनी चीन व ब्राझीलमध्ये करते. आयफोनला भारतात प्रचंड मागणी आहे. या कंपनीच्या प्रतिनिधीने अलीकडेच आपली भेट घेऊन महाराष्ट्रात येण्याची इच्छा प्रकट केली. या कंपनीचे प्रतिनिधी मंडळ भारतात आल्यास त्यांना येथील औद्योगिक वसाहतीमधील जागा दाखवण्यात येतील. त्याचबरोबर मोठ्या उद्योगांना प्रोत्साहनात्मक बाब म्हणून उद्योग विभागाकडून देण्यात येणारे कर सवलतीचे व अन्य सुविधांचे पॅकेज फॉक्सकॉन कंपनीला देण्याची तयारी दाखवली आहे. या कंपनीचे प्रतिनिधी मंडळ येण्याची सध्या आम्ही वाट पाहत आहोत. मात्र याबाबत कुठलाही सहमती करार झालेला नाही. अॅपलच्या उत्पादनांची निर्मिती महाराष्ट्रात सुरू झाली तर आयफोन व आयपॅड स्वस्त होतील. (विशेष प्रतिनिधी)
आयफोनला महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण
By admin | Published: June 13, 2015 2:15 AM