पुणे : स्मार्ट सिटी योजनेतील १४ प्रकल्पांच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी पद्मभूषण, पद्मश्री, महाराष्ट्रभूषण आदी पुरस्कारप्राप्त व्यक्ती, विविध क्षेत्रांतील मान्यवर, ३२ संघटनांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांसह महापालिकेच्या शाळांमधील ७०० विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून केवळ निमंत्रितांनाच या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे.स्मार्ट सिटी योजनेच्या कार्यक्रमाच्या तयारीची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली. या वेळी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे समन्वय अनिल पवार, पोलीस उपायुक्त बसवराज तेली उपस्थित होते. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत पास मिळाले नसताना भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून मात्र बुधवारपासून पास वाटले जात असल्याची टीका महापौरांनी केली. त्याबाबत अनिल पवार यांनी सांगितले, की निमंत्रितांच्या पासवर बारकोड टाकण्यात यावे अशा सूचना आल्याने छपाईसाठी वेळ लागला. गुरुवारी दुपारी २ वाजता मला या निमंत्रण पत्रिका प्राप्त झाल्या. महापौरांनी १५०० पासची तोंडी मागणी केली होती. मात्र एनएसजी पथकाने कोणाला पास दिला जाणार आहे त्यांचे नाव घेऊनच पास देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे नावांची यादी मिळताच पास दिले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांसह पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्तींना निमंत्रण
By admin | Published: June 24, 2016 2:09 AM