- प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या साहित्य संमेलनाचे निमंत्रण आपल्याला आले नसल्याचा गौप्यस्फोट कवी प्रवीण दवणे यांनी ‘लोकमत’कडे केला. निमंत्रणे वाटण्याचे काम सुरू असून ठाणे, मुंबईत सर्वांना निमंत्रण दिले जाईल, अशी सारवासारव संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी केली आहे. डोंबिवलीत होणाऱ्या नव्वदाव्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून दवणे उतरले होते. परंतु, या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली. निवडणूक निकालानंतर संमेलन आयोजकांनी आपल्याशी कुठल्याही बाबतीत संपर्क साधला नसल्याची माहिती त्यांनी दिली. ठाण्यातील काही साहित्यिकांनी त्यांना एक आठवड्यापूर्वीच निमंत्रण मिळाल्याची माहिती दिली. मात्र, दवणे यांना अद्याप निमंत्रण मिळालेले नाही. निमंत्रण येण्याची मी वाट पाहिलेली नाही. निमंत्रण न आल्याने मी दुसरे कार्यक्रम स्वीकारले आहे. मला निमंत्रण न देणे, हा आयोजकांच्या मनाचा मोठेपणा आहे. मात्र, निमंत्रण न मिळाल्याचे वाईट वाटत नाही. (प्रतिनिधी)