मुंबई/पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रख्यात साहित्यिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याचा विषय ताजा असतानाच प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांच्याबाबतही सांस्कृतिक मुस्कटदाबीचा प्रकार मुंबईच्या नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट येथे घडला. सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणांवर टीका केल्यामुळे पालेकर यांचे भाषण आयोजकांनी मध्येच थांबवले. या प्रकारामुळे सांस्कृतिक क्षेत्रात संताप व्यक्त होत आहे.प्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्टतर्फे शनिवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमोल पालेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पालेकर यांनी आपल्या भाषणात मुंबई आणि बंगळुरू येथील आधूनिक कला संग्राहलयाच्या सल्लागार समित्या बरखास्त केल्याबद्दल केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाविरूद्ध टिकेचा सूर लावतचा त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला गेला. पालेकरांचे भाषण औचित्यभंग करणारे होते, असा दावा आयोजकांनी केला आहे.या प्रकारावर पालेकर यांनी रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, मी काही अनाहूत नव्हतो, खास निमंत्रण देऊन मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते. कार्यक्रमापूर्वी संयोजकांनी मला काहीही सांगितले नव्हते. पण मी सांस्कृतिक क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या अनिष्ट प्रकाराविषयी बोलत असताना माझे भाषण मध्येच थांबविण्यात आले. मुंबईतील सल्लागार समितीने प्रभाकर बर्वे यांच्यासह एकूण तीन कलाकारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्याचे ठरविले होते. पण बर्वे सोडून उर्वरित दोघांच्या चित्रांची प्रदर्शने सल्लागार समितीची संमती न घेताच रद्द करण्याचा निर्णय मुंबई कला दालनाच्या संचालिका अनिता रुपवतरम यांनी घेतला. हा निर्णय कसा आणि कशासाठी झाला? हे प्रश्न मला उपस्थित करायचे होते. पण मी बोलत असतानाच कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास बहुलकर यांनी मला मध्येच भाषण थांबविण्यास सांगितले. कलेच्या व्यासपीठावरुन कलेविषयक गोष्टी करायच्या नाहीत तर मग कुठे करायच्या? आणि तसे असेल तर हा एकप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याावर घाला नव्हे का? असा प्रश्न पालेकर यांनी उपस्थित केला.एनजीएममध्ये घडलेल्या प्र्रकाराबद्दल संध्या गोखले-पालेकर यांनीही खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, पालेकर यांच्या भाषणानंतर ज्येष्ठ कलाकार ललिता लाज्मी, अंजू दोडिया, अमोल दोडिया यांनी त्यांचे कौतुक केले. काही विद्यार्थ्यांनी एकत्र येवून आमच्या भावना पालेकर यांनी व्यक्त केल्याचे सांगितले. या सगळ्या परिस्थितीवरु न वेगळ्या पद्धतीने अंकुश ठेवण्याचे काम सुरु असून यापुढील काळात कलाकार आणि त्यांची कला, याविषयी दिल्लीतील बाबू निर्णय घेणार का, असा सवालही त्यांनी केला.अमोल पालेकर यांचे भाषण औचित्याला धरून नव्हते. या विषयाला राजकीय वळण देणे सर्वस्वी चुकीचे आहे. या कार्यक्रमात नयनतारा सहगल यांच्याविषयी बोलणे योग्य नव्हते, म्हणून मी त्यांना विषयांतर नको एवढेच सांगितले. मी कुणाची मुस्कटदाबी वगैरे केलेली नाही की, कुणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणलेली नाही.- सुहास बहुलकर,अध्यक्ष, सल्लागार समितीकलेच्या व्यासपीठावरुन कलेविषयी गोष्टी करायच्या नाहीत तर मग कुठे करायच्या? आणि तसे असेल तर हा एकप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याावर घाला नव्हे का?- अमोल पालेकर
अमोल पालेकर यांच्याबाबतीत घडलेली ही घटना धक्कादायक आहे, पण विरळा नाही. गेली पाच वर्ष मोदी सरकार हेच करत आले आहेत. टीका करणाऱ्यांचे आणि आपल्याहून वेगळी विचारसरणी असणाºयांची तोंडं बंद करण्याचे त्यांचे प्रयत्न नेहमीच सुरू असतात.- सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस