ऐकावे ते नवलच : चोरट्यांकडून १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त...ऑनलाइन लोकमतलातूर, दि. २२ : शहरातील शाहुपुरी कॉलनीत रविवारी सकाळी घरफोडी झाली होती. या घटनेत २ लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत २४ तासांत तीन महिला चोरट्यांसह एका पुरुषाला सोमवारी सकाळी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, इतर चोरीच्या घटनांतही त्यांचा समावेश आहे का? याबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. विशेष म्हणजे मोठ्या घरफोडीच्या घटनेत महिलांचा सहभाग असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे़
राजीव गांधी चौक परिसरातील शाहुपुरी कॉलनीत अमोल माणिकराव पाटील (३३) हे आपल्या बेलकुंड येथे गावी अंत्यसंस्कारासाठी घराला टाळे लावून गेले होते. रविवारी सकाळी ७.३० वाजता बंद असलेल्या घरावर नजर ठेवून आरोपी सुचिता अर्जुन काळे (३५), मंगल किशोर सोनवणे (३५), सुनिता बन्सी काळे (४०) आणि प्रकाश उर्फ बांग्या सोपान काळे (३५ सर्व रा. नांदेड रोड लातूर) या चोरट्यांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले रोख २२०० रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ४५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
या प्रकरणी बेलकुंडहून आलेल्या अमोल पाटील यांना आपले घर फोडल्याची निदर्शनास आले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील चोरट्यांना पकडण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवर अलेल्या तीन महिला आणि एका पुरुषाला संशयित म्हणून ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविला. यावेळी आपण हे घर फोडल्याचे चोरट्यांनी कबूल केले. सोमवारी दुपारी चौघांना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २५ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
चौघांवर विविध ठाण्यात गुन्हे...शाहुपुरी कॉलनीतील घरफोडीत सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी तिघा महिलांसह एका पुरुषाला उचलले असून, त्यांच्याकडून निम्मा मुद्देमालही हस्तगत केला आहे. या तिन महिलांवर शहरातील शिवाजीनगर, गांधीचौक, एमआयडीसी, लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडीसारखे प्रत्येकांवर चार ते पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. पहाटेच्यावेळी घरफोडी करण्याची पध्दत या टोळीची खासियत आहे. प्रकाश उर्फ बांग्या सोपान काळे हा अट्टल गुन्हेगार आहे. हाच या टोळीचा म्होरक्या असून, महिलांचा घरफोडीत तो वापर करतो. त्याच्यावरही ११ गुन्हे दाखल असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी दिली.