औरंगाबाद : इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळविणाऱ्या आर.बी. हिल्स येथील एका अड्ड््याचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी रात्री धाड मारून पर्दाफाश केला. या धाडीत अड्डा चालविणाऱ्या दोन तरुणांसह एका बुकीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, सट्टा खेळविण्यासाठी बुकींना स्वतंत्र टेलिफोन लाईन देण्यासाठी वापरण्यात आलेले मिनि टेलिफोन एक्स्चेंज, ४८ मोबाईल हॅण्डसेट, लॅपटॉप, टीव्ही आणि चिठ्ठ्या जप्त केल्या. विशेष म्हणजे गतवर्षी याच बुकींचा अड्डा उस्मानपुरा परिसरात पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता.नरेश पोतलवाड (रा. उस्मानपुरा), अजित आगळे उर्फ छोटू (२४,रा. रमानगर) आणि बुकी प्रकाश ठोले (रा. हडको, टी.व्ही. सेंटर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपीपैकी नरेश पोतलवाड यास गत वर्षी गुन्हे शाखेने अशाच प्रकारचा आयपीएल क्रिकेटवर सट्टा चालविताना धाड मारून पकडले होते. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नरेश पोतलवाड याने पुन्हा शहरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र तो कोठे सट्टा चालवितो, याबाबतची माहिती काढण्यास पोलिसांना बराच कालावधी लागला. शेवटी रविवारी रात्री अंतिम सामना सुरू असताना पोलिसांनी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आर.बी.हिल्स येथील ‘एन’ इमारतीमधील फ्लॅट नंबर ४ मध्ये सुरू असलेल्या नरेश पोतलवाडच्या अड्ड्यावर छापा मारला. यावेळी नरेश बुकींसोबत आॅनलाईन संपर्कात होता. (प्रतिनिधी)
औरंगाबादेत पुन्हा ‘आयपीएल’वर सट्टा
By admin | Published: May 31, 2016 6:20 AM