ऑनलइन लोकमत
मुंबई, दि. २८ : वानखेडे स्टेडियमवरील आयपीएलच्या शेवटच्या सामन्यासाठी तुम्ही एका तिकिटाला हजारो रुपये मोजण्याची तयारी ठेवलीत, तरीही तुमची निराशा होईल. कारण एकच, शेवटचा सामना बघण्यासाठी प्रेक्षकांनी केलेली तुंडुंब गर्दी. मुंबई इंडियन्स सध्या वाईट कामगिरी करत असली तरी, आज वानखेडेवर हा संघ घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करेल आणि विजयी होऊन होम ग्राउंडला निरोप देईल अशी आशा मुंबईकरांना आहे, त्यामुळे एक ते दीड हजार रुपयांचे तिकिट पाच हजार रुपये मोजूनही मिळत नसल्याचे चित्र आहे.
तीव्र पाणीटंचाई आणि भीषण दुष्काळ असलेल्या महाराष्ट्रात, कडक निर्बंध घालून, इंड़ियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) क्रिकेट सामने खेळविण्यापेक्षा, हे अन्य राज्यांत खेळवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. परिणामी मे पासूनचे मुंबईतले सामने महाराष्ट्राबाहेर हलविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरातील सामने महाराष्ट्राबाहेर हलवण्यात आले आहेत. आज मुंबई इंडियन्स संघाचा वानखेडे मैदानावरील शेवटचा सामना आहे. आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांनी तुडंब गर्दी केली आहे. वानखेडे परिसरात कडेकोट पोलिस व्यवस्था करण्यात आली आहे.
आयपीलएच्या यंदाच्या सत्रात धडाकेबाज कामगिरीसह विजयी लाटेवर स्वार झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सला चढउताराचा सामना करीत असलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध आज गुरुवारी वानखेडेवर विजयाची आस लागली आहे. गुणांचा विचार केला, तर कोलकाता अव्वल व मुंबई पाचव्या स्थानावर आहे.
दोन्ही संघांनी प्रत्येकी दोनदा आयपीएलचे जेतेपद पटकविले आहे. त्यामुळे उभय संघ तुल्यबळ वाटतात. पण पाचपैकी चार सामने जिंकणाऱ्या कोलकाताचे पारडे सध्यातरी जड वाटते. मुंबईच्या कामगिरीत सातत्य नाही. त्यांना सातपैकी तीनच विजय शक्य झाले तर चार सामन्यांत पराभवाला तोंड द्यावे लागले.