मुंबई - भारतातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहून आयपीएल २०२१ ( IPL 2021) मधून परदेशी खेळाडूंच्या माघारीचे सत्र सुरूच आहे. RCBचा अॅडम झम्पा व केन रिचर्डसन यांनी माघार घेतली, तर राजस्थान रॉयल्सच्या लायम लिव्हिंगस्टोन व अँड्य्रू टाय यांनीही बायो बललला कंटाळून मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज पॅट कमिन्स ( Pat Cummins) यानं भारताला कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत केली आहे. त्यानं ५० हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळपास ३० लाख रुपये PM Care Fundला दान करण्याचे जाहीर केले. पॅटच्या या निर्णयाचं देशवासीयांनी स्वागत केलंय. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या निर्णयाचं कौतुक केलंय.
पॅटने आपल्या अन्य सहकाऱ्यांनाही कोरोना काळातील विदारक चित्र पाहता भारताला मदत करण्याचं आवाहन केलं. पॅट कमिन्स म्हणाला, ''मी अनेक वर्ष भारतात येत आहे आणि मी या देशाच्या प्रेमात पडलो आहे. येथील लोकं खूप चांगली आहेत. कोरोना संकटात अनेकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, याची मला कल्पना आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आयपीएल खेळवणे योग्य की अयोग्य यावर चर्चा सुरू आहे. मी भारत सरकारला सांगू इच्छितो की लॉकडाऊनच्या काळात आयपीएलमुळे किमान चार तास तरी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलत आहे.''
''एक खेळाडू म्हणून माझीही काही जबाबदारी आहे आणि मी PM Cares Fund साठी काही निधी दान करत आहे, विशेष करून भारतातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनच्या खरेदीसाठी हा निधी असेल. आयपीएलमधील मी माझ्या सहकाऱ्यांनाही मदतीचं आवाहन करतो,'' असेही तो म्हणाला. पॅटच्या या निर्णयाचं राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वागत केलंय.
शेल्डन जॅक्सनेही केलं मदत अन् मदतीचं आवाहन
कोलकाता नाईट रायडर्सचा आणखी एक खेळाडू शेल्डन जॅक्सन ( Sheldon Jackson) यानं कोरोना लढ्यात हातभार लावला आहे. जॅक्सननं गौतम गंभीर फाऊंडेशनला आर्थिक मदत केली आहे, त्यानं ही रक्कम जाहीर केली नाही. त्यानं सोशल मीडियावरून अन्य खेळाडूंनाही मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. ''या संकट काळात अनेकांच्या वेदना पाहून माझं मन रडत आहे. चांगले दिवस लवकर येऊ दे, अशी प्रार्थना देवाकडे करतो. सरकारनं आखलेल्या सर्व नियमांचे पालन करा, अशी विनंती मी सर्वांना करतो. कृपया घरीच थांबा आणि जेव्हा बाहेर जाल तेव्हा न विसरता मास्क घाला. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या गौतम गंभीर फाऊंडेशनला मी माझ्याकडून मदत केली आहे. मी इतरांनाही मदतीचं आवाह करतो,''अशी पोस्ट शेल्डननं लिहिली आहे.