- जमीर काझी मुंबई : अत्यंत अटीतटीच्या निवडणूकीत महाराष्ट्र राज्याच्या चौदाव्या विधानसभेत एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला तर एका आयपीएसच्या पत्नीला प्रवेश करण्यात यश आले आहे. तर तिघा माजी पोलीस अधिकाऱ्यांचा विरोधकांकडून अक्षरक्ष: ‘एन्काउंटर’ झाला आहे. त्यापैकी दोघांना आपली अनामत रक्कम सुद्धा वाचविता आलेली नाही.विधानसभा निवडणूकीत बीड जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघातून मेघना दीपक साकोरे- बोर्डीकर व नंदूरबार जिल्ह्यातील शहाडा मतदारसंघातून राजेश पाडवी हे भाजपाच्या उमेदवारीवर विजयी झाले आहेत. मेघना या पुणे रेल्वे पोलीसचे अधीक्षक दीपक साकोरे यांच्या पत्नी आहेत. तर पाडवी यांनी आठ वर्षाची सेवा शिल्लक असताना निरीक्षक पदाचा राजीनामा देवून रिगंणात उतरले होते. मात्र या दोघांच्या विजयासाठी पोलीस खाते नाही तर भक्कम राजकीय पार्श्वभूमी कारणीभूत ठरली आहे.या दोघांशिवाय रिंगणात उतरलेल्या एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, सहाय्यक आयुक्त सर्वश्री शमशेर खान पठाण, गौतम गायकवाड यांना आपापल्या मतदारसंघात मोठ्या फरकाने पराभवाची चव चाखावी लागली आहे. शर्मा यांनी सेनेच्या तर उर्वरित दोघांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर नशीब आजमाविले होते.विधानसभा निवडणूकीसाठी पोलिसांशी संबंधित असलेले प्रत्येकी दोन उमेदवार भाजपा व वंचित आघाडीने तर शिवसेनेने एकाला उमेदवारी दिली होती. माजी मंत्री बोर्र्डीकर यांच्या कन्या असलेल्या मेंघना साकोरे यांना भाजपाने जिंतूरमधून उतरविले होते. त्यांनी कॉँग्रेसचे विजय भांबळे यांचा ३,७१७ मतांनी विजय मिळविला. दोघांना अनुक्रमे १,१६९१३ व ११३१९६ इतकी मते पडली. वंचित बहुजन आघाडीच्या मनोहर वाकळे यांनी १३,१७२ मते मिळवित मेंघना यांचा विजय सुकर केला. पतीपेक्षा त्यांच्या पित्याने राजकीय कारर्किद पणाला लावली होती. शहाडातून दणदणीत विजय मिळविलेले राजेश पाडवी यांनी कॉँग्रेसचे उमेदवार अॅड. पद्माकर वळवी यांचा ७,९७१ मतांनी पराभव करीत वडीलांची जागा कायम राखली. २०१४ च्या निवडणूकीत त्यांचे वडील उद्देसिंग पाडवी यांनी वळवींना पराभूत केले होते.निवृत्तीला काही महिने शिल्लक असताना निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी खात्याला रामराम ठोकून सेनेच्या तिकीटावरुन नालासोपारा मतदारसंघातून नशिब आजमावित होते. मात्र प्रतिष्ठेच्या लढतीत बहुजन विकास आघाडीच्या क्षितीज ठाकूर यांनी त्यांचाच ‘एन्काउंटर’ केला, तब्बल ४३ हजार ७२९ इतक्या मताधिक्यांनी पराभव केला.त्याशिवाय निवृत्त सहाय्यक आयुक्त शमशेर खान पठाण व निवृत्त निरीक्षक गौतम गायकवाड हे ‘वंचित’च्या तिकीटावर अनुक्रमे मुंबादेवी व वरळी मतदारसंघातून उभे होते. दोघांना अनुक्रमे अवघी १२६४ व ६५७२ मते मिळाली. कॉँग्रेसच्या अमीन पटेल व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून पानिपत होताना त्यांची डिपॉझिटही राखता आली नाही.