मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्यांना आपल्या स्थावर मालमत्तेबद्दल माहिती कळविण्याबाबतची सूचना केंद्रीय गृह विभागाकडून करण्यात आलेली आहे. वर्षभरात त्यांच्याकडून खरेदी, विक्री करण्यात येणाऱ्या अचल संपत्तीचा सविस्तर तपशील त्यांना कळवावयाचा आहे. त्यासाठी ३१ जानेवारीपर्यतची मुदत देण्यात आली आहे.
आयपीएस अधिकाऱ्यांना आपल्या मालमत्तेचा तपशील गृह विभागाला द्यावा लागतो. त्याचप्रमाणे त्यांनी स्वत:च्या, पत्नीच्या किंवा अठरा वर्षाखालील मुलांच्या नावे काही स्थावर संपत्ती खरेदी अथवा विक्री केल्यास त्याबद्दलची माहिती देणे बंधनकारक असते. त्यासाठीच्या विहित नमुन्यातील अर्ज गृह विभागाच्या संकेतस्थळावर ३१ जानेवारीपर्यत पाठवावयाचा आहे. तो मुदतीमध्ये न पाठविल्यास संबंधित अधिकाऱ्यांना केद्रीय दक्षता (व्हिजिलिएन्स) विभागाकडून प्रमाणपत्र दिले जाणार नाही. त्याचा फटका त्यांना पदोन्नती तसेच बदली आणि प्रतिनियुक्ती नेमणूकीत अडसर येवू शकतो.