मुंबई/कोल्हापूर : कोल्हापुरातील २२० कोटी रुपयांच्या ४९ किलोमीटरच्या वादग्रस्त रस्ते प्रकल्पाचा खर्च म्हणून ८११ कोटी रुपये मिळावेत, असा दावा या रस्त्याचे विकासक असलेल्या आयआरबी कंपनीने सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत शासनाकडे केला. शासनाने नेमलेल्या तामसेकर मूल्यांकन समितीने ४५० कोटी देय असल्याचा अहवाल दिला आहे.रकमेत मोठी तफावत आहे. त्यासाठी अजून चर्चा आवश्यक असल्याने टोल स्थगितीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आणखी ३७ दिवस वाढविण्याचा निर्णय बैठकीत झाला. आयआरबीने मागितलेली रक्कम पाहता हा प्रश्न चिघळण्याचीच शक्यता व्यक्त होत आहे.सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी व राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोप्पलवार व आयआरबी कंपनीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.प्रकल्पाचे पूर्ण झाला असून कंपनीने घेतलेल्या कर्जाचे ५७० कोटी रुपयांचे पत्रच बैठकीत सादर केले. तामसेकर समितीने या प्रकल्पाची किंमत व्याजासहित ४५० कोटी रुपयेच मूल्यांकन केले आहे. त्यामुळे शासन तेवढीच रक्कम देऊ शकते.
‘आयआरबी’ने केला ८११ कोटींचा दावा
By admin | Published: November 24, 2015 3:02 AM