ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 05 - रेल्वेचं तिकीट बुक करण्यासाठी वापरण्यात येणारी इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरशन अर्थात आयआरसीटीसीची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. वेबसाईट हॅक करुन 1 कोटी लोकांची वैयक्तिक माहिती चोरीला गेली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशाप्रकारे रेल्वेची वेबसाईट हॅक झाल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाईट आयआरसीटीसी ज्यावरुन दिवसाला लाखो लोक व्यवहार करतात हॅक करण्यात आली आहे. आयआरसीटीसीच्या या वेबसाईटवर ग्राहक किंवा प्रवासी आपली वैयक्तिक माहिती शेअर करत असतात. ज्यामध्ये पॅनकार्डसारख्या महत्वाच्या कागदपत्रांचा समावेश असतो. तिकीटाचं आरक्षण करायचं असेल तर ऑनलाइन अर्ज भरतेवेळी वैयक्तिक माहिती देणं बंधनकारक असतं. 'चोरी केल्या गेलेल्या माहितीवरुन बोगस कागदपत्रे तयार केली जाऊ शकतात', अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-याने दिली आहे.
'वेबसाईटवरील माहिती अत्यंत महत्वाची आहे. कंपन्यांना आपला टार्गेट पुर्ण करण्यासाठी लोकांची वैयक्तिक माहिती हवी असते जेणेकरुन आपल्याला हवे असलेले ग्राहक मिळवता येतात त्यामुळे त्यांना हा डाटा विकला जाऊ शकतो' अशी शक्यता आयआरसीटीसीने व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकारला याबद्द्ल आयआरसीटीसीकडून माहिती देण्यात आली आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के पी बक्षी यांनी महाराष्ट्र पोलिसांना अलर्ट दिल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे मात्र अधिक माहिती देण्यास नकार दिला.