मुंबई : महिनाभरापूर्वी आगीमुळे कोलमडलेली इटारसीतील स्वयंचलित सिग्नल पॅनल यंत्रणा अद्याप पूर्ववत झालेली नाही. यामुळे दररोज शेकडो मेल-एक्स्प्रेस रद्द होत असून, मध्य रेल्वेला ३ कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. सिग्नल पॅनल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी १२०० कर्मचारी झटत आहेत. २४ जुलैपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता असून, तोपर्यंत भारतीय रेल्वेला तब्बल १२०० कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. गाड्या रद्द झाल्याने १०० कोटींचे नुकसान होण्याचा अंदाज मध्य रेल्वेने व्यक्त केला आहे.मध्य प्रदेशातील इटारसीमधील सिग्नल पॅनल यंत्रणेद्वारे रेल्वेच्या उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम या भागातून दररोज ३३0हून अधिक मेल-एक्स्पे्रस हाताळल्या जातात. आग लागल्यामुळे स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बंद पडली असून, सध्या या ठिकाणी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडूनच सिग्नल यंत्रणा हाताळली जात आहे. स्वयंचलित यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी १,२00 हून अधिक कर्मचारी कार्यरत असल्याचे पश्चिम-मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पीयूष माथूर यांनी सांगितले. स्वयंचलित सिग्नल यंत्रणा २४ जुलैपर्यंत पूर्ववत होईल, असा विश्वास माथूर यांनी व्यक्त केला. या कालावधीत रेल्वे खात्याला १२०० कोटींचे नुकसान होईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर दररोज ३ कोटींचे नुकसान सहन करणाऱ्या मध्य रेल्वेला १०० कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)वेग मंदावला आगीत स्वयंचलित यंत्रणा जळाल्याने या ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांकडूनच सिग्नल यंत्रणा हाताळली जात आहे. यामुळे गेल्या महिनाभरापासून इटारसी परिसरात लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा वेग ताशी १५ कि.मी. इतका कमी करण्यात आला आहे. यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला असून, २४ जुलैपर्यंत दोन हजार पॅसेंजर गाड्या आणि शंभरहून अधिक मालगाड्याही रद्द होतील, असा अंदाज रेल्वेने व्यक्त केला.
इटारसीतील सिग्नल पॅनल यंत्रणा नादुरुस्त
By admin | Published: July 14, 2015 1:28 AM