मुंबई : सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या शपथपत्राने माजी जलसंपदामंत्री अजित पवार गोत्यात आले आहेत. हे शपथपत्र म्हणजे, भाजपाचे षडयंत्र असल्याची टीका विरोधकांनी करताच, आता दोन प्रकरणांच्या चौकशीचा अहवाल न्यायालयात आहे. आणखी २०० प्रकरणांची चौकशी बाकी असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
एसीबीने शपथपत्रात अजित पवार यांच्यावर अनियमिततेचा ठपका ठेवून सिंचन घोटाळ्यास त्यांना जबाबदार धरले आहे. विधिमंडळात मराठा आरक्षणाचा विषय तापलेला असताना, शपथपत्र सादर करण्यासाठी एसीबीने ‘हीच’ वेळ साधल्याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे. विधिमंडळात याचे पडसाद उमटले नाहीत. मात्र, सभागृहाबाहेर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या कारवाईवर शंका व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, निवडणुका तोंडावर येताच, विरोधी पक्षाच्या नेत्याविषयी संशय निर्माण करण्याचे काम सरकार करत आहे. अजित पवार यांचा यात सहभाग नाही. ते न्यायालयीन लढाई लढतीलच, पण एसीबीचे शपथपत्र लगेच माध्यमांकडे कसे पोहोचले?
गिरीश महाजन म्हणाले, या चौकशीत सरकारचा हस्तक्षेप नाही. प्रकल्पांना मंजुरी देताना प्रक्रिया नियमानुसार पार पाडली नाही. त्यामुळे आक्षेप घेणे चुकीचे आहे. या प्रकरणाची ईडी चौकशी करणार का? असे विचारता, हा विषय सरकारपुढे नाही, असे ते म्हणाले.
भुजबळांची टीकासत्ता आल्यावर सत्ताधारी भुजबळ-भुजबळ करीत होते. आता निवडणुका येताच अजित पवारांना लक्ष्य केले आहे. आतापर्यंत सत्ताधारी झोपले होते का? मंत्री व भाजपाचे नेते आधी बोलतात, त्यानंतर पोलीस कारवाई होते, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला.
न्यायाधीशांचा नकार !या घोटाळ्याप्रकरणी बुधवारी नागपूर खंडपीठात सुनावणी होती, परंतु न्या. रवी देशपांडे यांनी वैयक्तिक कारणामुळे हे प्रकरण ऐकण्यास नकार दिला. त्यामुळे अर्जदारांना आता हे प्रकरण दुसऱ्या न्यायपीठापुढे लावून घ्यावे लागेल.चौकशीला सहकार्य - अजित पवारभाजपा नेत्यांनी माझ्यावर वेगवेगळे आरोप केले. त्यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी खुली चौकशी सुरू केली. मला चौकशीला बोलावले, तेव्हा मी गेलो. लेखी प्रश्नावलीला उत्तरे दिली. मी तपास यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करत आहे. कोणालाही फायदा होईल, असे काम मी केलेले नाही. प्रकरण न्यायालयात असल्याचे अधिक बोलू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली.