मुंबई - रायगडमधील इरसाळवाडीत दरड कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. अशा घटना घडल्यानंतर सरकार जागे होते व उपाय योजनांच्या घोषणा करते, पण अशा घटना घडू नयेत म्हणून आधीच काही उपयायोजना का केल्या जात नाहीत. कोकणात याआधीही अशा दुर्घटना घडल्या पण त्यातून बोध काहीच घेतलेला दिसत नाही. इरसाळवाडी दुर्घटनेने राज्यावर शोककळा पसरली आहे, शेकडो लोकांची कुटुंबं रस्त्यावर आली आहेत आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या पार्ट्या झोडल्या जात आहेत, एवढे आपण असंवेदनशील कसे? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
इरसाळवाडी दरड दुर्घटनेवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सत्ताधाऱ्यांमध्ये जरा तरी संवेदना उरल्या आहेत का? समृद्धी महामार्गावर अपघात होऊन २६ लोक मृत्यूमुखी पडलेले असताना हेच सत्ताधारी दुसऱ्याचा पक्ष फोडून राजभवनवर थाटात शपथविधी सोहळा करत होते आणि आता इरसाळवाडी येथे गरिब, नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असताना वाढदिवसाच्या पार्ट्या करत आहेत. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सगळी लाजलज्जा सोडून दिली आहे का? विरोधी पक्ष या नैसर्गिक अपघाताचे राजकारण करत नाही पण सत्ताधारी पक्षाला जनाची नाही तर मनाची तरी असायला हवी, पण या लोकांनी सर्वच सोडून दिली आहे. लोक मत्युमुखी पडले आहेत, अनेक जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. ज्या घरातील लोक मरण पावले त्यांचे डोळे पुसण्याचे, त्यांना आधार देण्याचे काम सरकारने केले पाहिजे पण हे सरकारच उफराट्या काळजाचे आहे, असा संताप पटोले यांनी व्यक्त केला.
डॉ. मनमोहनसिंह सरकार असताना पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी माधवराव गाडगीळ समिती स्थापन केली होती. माधवराव गाडगीळ समितीने दिलेल्या अहवालाचा विचार झाला पाहिजे होता, त्याची अंमलबजावणी व्हायला हवी होती पण ती झालेली नाही. सरकार तज्ञांची समिती गठीत करते त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केला जातो पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही. इरसाळवाडी सारख्या घटनांमधून आपण काही बोध घेतला पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही हे दुर्दैवी आहे, असेही पटोले म्हणाले. नाना पटोले यांनी रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसाळवाडी दुर्घटना स्थळाला भेट देऊन माहिती घेतली व मदत कार्याची पाहणीही केली.