- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
निष्पाप चिमुकल्या मुलींनो,
कोणावरही येऊ नये अशी वेळ तुमच्यावर आली. जो तुम्हाला तुमच्या दादासारखा वाटत होता त्यानेच तुमचा घात केला. तुम्ही जेव्हा मोठ्या व्हाल, दुर्दैवाने तुम्हाला तुमच्यावरील अत्याचाराची माहिती मिळालीच, तर त्या अक्षय शिंदेला मारले की तो मेला? असा प्रश्न तुम्हाला पडेल. तेव्हा अशी काही घटना घडली होती हे देखील लोक विसरून गेलेले असतील... समुहाला विस्मृतीचा शाप असतो. ज्याचे जळते त्यालाच ते आयुष्यभर जाळत राहते. तुमच्या आयुष्यात घडलेली घटना तुम्हाला कधीही आठवू नये, ही परमेश्वराकडे प्रार्थना. त्या अक्षय शिंदेला न्यायालयात उभे करायला हवे होते. उलटे-सुलटे प्रश्न विचारून त्याला त्याच्या काळ्या कृत्याची जाणीव करून देताना, आपल्याला फाशी अटळ आहे, याची जाणीव त्याला क्षणोक्षणी करून दिली असती आणि त्यानंतर वधस्तंभावर नेऊन जल्लादाने त्याच्या गळ्यात फास लटकावला असता तर त्याला कायदा काय हे कळले असते. असे घाणेरडे कृत्य करणाऱ्याला फाशीची शिक्षा होऊ शकते, ही भीती समाजात निर्माण झाली असती. मात्र बाळांनो, दुर्दैवाने असे काहीच घडले नाही..!
अक्षय शिंदेच्या डोक्यातच गोळी का मारली? पोलिस डोक्यावर गोळी मारतात की पायावर? तुम्ही चार-पाच जण होतात. तुम्हाला एका पोरावर नियंत्रण मिळवता आले नाही का? तुम्ही तुमच्या कमरेला लावलेले पिस्तूल लॉक केले होते की अनलॉकच ठेवले होते..? असे पिस्तूल अनलॉक ठेवता येते का..? अक्षय शिंदेला बंदूक कशी लोड करतात? लॉक कसे उघडतात? फायर कसे करतात, हे माहिती होते का? की ते देखील त्याला कोणी शिकवले होते..? ज्याने आयुष्यात कधी पिस्तूल पाहिले नाही ते त्याला हातात घेतल्या घेतल्या अनलॉक कसे करता आले..? असे असंख्य प्रश्न न्यायालयाने केले. अशक्त माणूस पिस्तूल लोड करू शकत नाही. ती कशी लोड करतात मला माहिती आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपीला नेताना पोलिस इतके निष्काळजीपणे कसे वागू शकतात, असेही न्यायमूर्तींनी विचारले. त्यांच्या या प्रश्नांनी अवघे समाजमन अस्वस्थ झाले. पण स्वतःच्या बचावात त्याला मारून टाकणारे पोलिस यावर गप्पच आहेत.
अक्षयला हातकडी लावली होती का? त्याला छोट्या पोलिस जीपऐवजी मोठ्या पोलिस व्हॅनमधून का नेण्यात आले? त्या व्हॅनच्या खिडक्या पडद्यांनी का झाकल्या होत्या? वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयात हजर करणे आवश्यक असताना सायंकाळी उशिरा त्याची कोठडी का घेण्यात आली? न्यायालय संध्याकाळी ६:३० वाजता बंद होतात हे माहिती नव्हते का? या प्रश्नांची उत्तरे कधीच समोर येणार नाहीत. मात्र, तुमच्यावरील अन्याय, अत्याचार करणाऱ्याला फासावर लटकवता आले नाही, ही खंत न्यायव्यवस्थेवर विश्वास असणाऱ्यांना कायम टोचत राहील...
लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने आयजी आरती सिंग यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये संशयास्पद पार्श्वभूमी असलेल्या संजय शिंदे यांच्यासारख्या अधिकाऱ्याची नियुक्ती का करण्यात आली? अक्षय शिंदेच्या बायकोने दिलेल्या तक्रारीच्या तपासासाठी पीआय संजय शिंदे यांना क्राइम ब्रँचच्या सेंट्रल युनिटमध्ये का परत बोलावण्यात आले? अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरण आरती सिंग यांच्या एसआयटीकडे का सोपवण्यात आले नाही? ज्यामुळे अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासाला बळ मिळाले असते. ठाणे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करायचा होता, तरीही अक्षय शिंदेच्या माजी पत्नीने केलेल्या दाव्याची चौकशी करण्यासाठी महिला अधिकाऱ्याला का नियुक्त करण्यात आले नाही? या प्रश्नांची उत्तरे कोणीच का मागत नाही. उलट त्या नराधमाला गोळी मारून ठार केल्याचा आनंद पेढे वाटून साजरा केला जात आहे.
अतिरेकी कसाबला जिवंत पकडले म्हणून २६/११ च्या हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याचे उघडकीस आले. अक्षय शिंदेला फासावर लटकवेपर्यंत सगळी माहिती गोळा केली असती, तर आणखी काय समोर आले असते कोण जाणे..? ते आता कधीच समोर येणार नाही. हाच न्याय आहे तर उरणच्या घटनेत अत्याचार करणाऱ्याने क्रौर्याचा कळस गाठला होता. त्या आरोपीलाही गोळ्या घालायला हव्या होत्या का..? दरवेळी एकाच रिमोट एरियात अशा घटना का घडतात..? अक्षय शिंदेने झाडलेली गोळी अधिकाऱ्याच्या नेमकी मांडीलाच कशी लागली..? याचीही उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा तुम्ही करू नका...
अनेक पोलिस अधिकाऱ्यांचे बळी घेणाऱ्या कसाबच्या गोळ्या स्वतःच्या अंगावर घेणारे तुकाराम ओंबाळे आम्हाला आठवले. कसाबला जिवंत पकडल्यामुळे पाकिस्तानचा कट आपण उघड करू शकलो. मात्र, तुमच्या निष्पाप जीवाला त्रास देणाऱ्याला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेण्याची जबाबदारी ज्यांची होती त्यांना स्वतःचीच सुरक्षा महत्त्वाची वाटली... फाशीच्या शिक्षेपेक्षा अक्षय शिंदेच्या डोक्यात गोळी मारण्यात त्यांनी धन्यता मानली... यापेक्षा दुर्दैव दुसरे कोणते असू शकते..! इक्वलिटी, फेअरनेस आणि एक्सेस ही न्याय संकल्पनेची तीन प्रमुख तत्त्व आहेत. त्यांचे काय झाले असे आता कोणी विचारू नये...- तुमचाच बाबुराव