Eknath Shinde vs NCP: महाराष्ट्रात जून महिन्यात अभूतपूर्व बंडखोरी झाली. शिवसेनेतून अतिशय विश्वास मानले जाणारे एकनाथ शिंदे आपल्या काही सहकारी आमदारांसोबत आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. त्यांना नंतर ५० आमदारांचा पाठिंबा मिळाला. एकनाथ शिंदे यांच्या गटाने काही अपक्ष आणि भाजपा यांच्यासोबत सत्तास्थापना केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या सरकारला ऑगस्ट महिन्यात मंत्रिमंडळही मिळाले. पण तसे असले तरी या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. इतकेच नव्हे तर एकनाथ शिंदे गट राज्यात गुंडाराज आणू पाहत आहे का? असा सवालच राष्ट्रवादीते प्रवक्ते क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) यांनी केला आहे.
"ईडी सरकार आल्यापासून शिंदे गटाच्या मंत्र्यांनी कायदा हातात घेऊन लोकांवर हल्ला केल्याच्या किंवा कायद्याची आणि न्यायव्यवस्थेची भीती न बाळगता अवमानकारक विधाने केल्याच्या घटना घडल्या आहेत. आमदार संतोष बांगर आणि मंत्री दादा भुसे व्यक्तींना मारहाण करताना व्हिडीओमध्ये दिसले. मंत्री अब्दुल सत्तार महिला खासदाराविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरताना दिसले. आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांना विरोधकांविरोधात बळाचा वापर करायला सांगत आहेत. त्यातच शिंदे गटाच्या नगरसेवकांनी जबरदस्तीने मुंबई महापालिका मुख्यालयातील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेण्याचा मुद्दा ताजा आहे," असे क्रास्टो यांनी निदर्शनास आणून दिले.
"हे सर्व लोक लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे लोकशाही मूल्यांचे पालन करून इतर नागरिकांसमोर एक आदर्श निर्माण करण्याऐवजी, व लोकांची सेवा करण्याऐवजी ते स्वतःच कायदा हातात घेत आहेत. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाप्रमाणे त्यांनीही कायद्याचे पालन केले पाहिजे आणि न्यायव्यवस्थेचा आदर केला पाहिजे. मात्र शिंदे गट ‘दादागिरी’ करून आपला दबदबा निर्माण कराचा प्रयत्न करत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांचा मित्रपक्ष असलेला भाजप या मुद्द्यांवर गप्प बसून या गैरकृत्यांकडे डोळेझाक करत आहे. हे सगळं बघून आपल्या मनात एक प्रश्न येतो... एकनाथ शिंदे गट महाराष्ट्रात ‘गुंडाराज’ आणू पाहत आहे का?" असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्रास्टो यांनी केला.