नागपूर – माझा बाप, भाऊ, लेक कुणीतरी विद्यार्थी या ड्रग्जच्या विळख्यात अडकत असेल तर मी बोलायचं नाही का? मी राजकीय पक्षाची आहे सोडून द्या, एक सामान्य नागरिक म्हणून मी प्रश्न विचारायचे नाही का? महाराष्ट्रात NIA ची टीम आली होती. ललित पाटील आणि प्रदीप शर्मा एकाच बराकीत होते. ललित पाटीलला केवळ हार्निया झालाय म्हणून ९ महिने रुग्णालयात ठेवले. ससूनला ललित पाटीलला दाखल करून घेताना एक अधीक्षक होते. अजय चावरेंबद्दल मी सांगायचे का? आरोग्यमंत्र्यांना माहिती नाही का? हे चावरे तेच होते जे किडनी रॅकेट प्रकरणात मुख्य आरोपी होते. अवयव प्रत्यारोपन समितीत सदस्य होते. माणसाच्या जीवाची काय किंमत आहे की नाही. मी तोडपाण्याचा माणूस नाही. एकीकडे तुमचा पक्ष नवरात्री साजरा करतो, नवदुर्गाचा सन्मान करतो, पण एक बाई लढतेय म्हटल्यावर तिला साथ द्यायचे सोडा, प्रोत्साहन द्यायचे सोडा, मला धमकावता? घाबरवता असा सवाल करत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या पत्रकार परिषदेत ढसाढसा रडल्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस ४० सेकंदाचा बाईट दिला, माझ्या काल मेंदूतच घुसत नव्हते. मी एअरपोर्टला होते, कारण माझ्या भावाचा अपघात झाला. डगमगणार नाही, घाबरणार तर अजिबात नाही. बोलणाऱ्यांची तोंडं बंद होतील, हा इशारा, धमकी आहे का? म्हणजे काय कराल. संपवून टाकाल. मलिक आणि राऊतांना अडकवलं तसं अडकवाल. आयुष्यभर मी संविधानिक भाषा सांगत आलीय. आपण एका पक्षाचे नेते नाही तर राज्याचे गृहमंत्री आहात. राज्यातील कुठल्याही नागरिकाच्या प्रश्नाला तुम्ही उत्तर दिले पाहिजे. मी कधीही तुमच्याबाबत आदराने बोलली. उडता महाराष्ट्र झाला नाही पाहिजे असं मी म्हणतेय. मला धमकी देऊ नका. मी चळवळीतून आलीय, विष प्रयोग झाले, बजरंगदलाने मानेवर तलवार ठेवली होती. परिवर्तनाची परिभाषा समजून जगणारी आहे. तरीही तुम्हाला धमक्या द्यायचे असतील तर ड्रग्जमाफियांना द्या असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत चरणसिंह राजपूत हे पुण्याचे उत्पादन शुल्काचे अधीक्षक आहेत. राजपूत आणि तुमचे काय सख्य आहे ज्यामुळे त्यांच्या तक्रारीकडे तुम्ही दुर्लक्ष करता? राजपूत यांनी नोकरीवर लागताना बोगस जातप्रमाणपत्र दिले होते. मी गरीब असून माझ्याकडे तत्व आणि निष्ठेशिवाय दुसरे काही नाही. राजपूत यांच्या जातप्रमाणपत्राची चौकशी सुरू आहे. अनेक लोकांच्या त्यांच्याबाबतीत तक्रारी आहेत. हा अधिकारी तुमचा लाडका आहे? ड्रग्ज प्रकरण उत्पादन शुल्क विभागाशी निगडीत असल्याने त्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारायचा नाही का? असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभुराज देसाईंवर प्रहार केला आहे.