आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक आहे का? अजित पवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 03:39 PM2023-07-05T15:39:06+5:302023-07-05T15:40:08+5:30

Ajit Pawar vs Sharad Pawar : आज बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला.

Is it our fault that we are not born to someone? Ajit Pawar's question to Sharad Pawar | आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक आहे का? अजित पवारांचा सवाल

आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक आहे का? अजित पवारांचा सवाल

googlenewsNext

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील बैठकीत बोलताना मोठे गौप्यस्फोट केले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांनी आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? असा थेट सवाल विचारत अप्रत्यक्षरित्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.

शरद पवारांनी मला सांगितलेले की मी उद्या पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देतोय. सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा. मी त्यासाठी तयार होतो. पण दोन दिवसांत काय असे घडले की शरद पवारांनी अचानक निर्णय फिरवला आणि राजीनामा मागे घेतला. सरकारी अधिकारी ५८ व्या वर्षी निवृत्त होतो. भाजपात ७५ व्या वर्षी निवृत्त केले जाते. तुम्हीही आम्हाला आशिर्वाद द्यायला हवा होता, असे सांगत एकप्रकारे शरद पवारांनी निवृत्त व्हायला हवे होते, असे सूतोवाच अजित पवारांनी केले. 

याचबरोबर, मी काही दिवसांनी सुप्रियासोबत बोललो. आपण एकाच घरात वाढलो, लहानाचे मोठे झालो. शरद पवारांना समजाव, असे तिला म्हणालो. परंतू तेव्हा सुप्रियाने ते हट्टी आहेत, ऐकणारे नाहीत असे मला सांगितले होते. साहेबांनी कुठेतरी थांबायला हवे होते. आपला राष्ट्रीय पक्ष आता राज्याचा झालाय. तो वाढविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवे होते. यासाठी नवीन नेतृत्वाला संधी देणे गरजेचे होते. भाजपला पाठिंबा द्यायचा निर्णय पवारांनीच घेतला होता. मग, लोकांसमोर मला का व्हिलन केलं जातं आहे ते कळत नाही. मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक आहे का? आज राज्यात ज्या चार पाच महत्वाच्या नेत्यांमध्ये माझे नाव शेवटचे तरी नाही का? आम्ही राज्याचे नेतृत्व करू शकत नाही का? असे सवाल अजित पवारांनी केले. 

मुख्यमंत्री होण्याचीही इच्छा
आज बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री होण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. मला मनापासून वाटतं की मुख्यमंत्री व्हावं, असं अजित पवार म्हणाले आहेत. मी जातीपातीचं नात्यागोत्याचं काम केलं नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचं काम करतो. पहाटे कामाला सुरुवात करतो. आजही करतो. महाराष्ट्र पुढे जावं म्हणून हे करत असतो. देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून मी काम करत असतो, असंही अजित पवार म्हणाले.

Web Title: Is it our fault that we are not born to someone? Ajit Pawar's question to Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.