मुंबई – देशात काही राज्यांत निवडणुका सुरू आहेत. क्रिकेटमध्ये जसे नियम असतात तसे निवडणुकीच्या प्रचारात असतात. आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे, त्यात काही गोष्टींवर खुलासा करण्याची मागणी केली आहे. केवळ भाजपा सत्तेत बसलाय म्हणून त्यांना फ्री हीट द्यायची आणि आम्ही काही केले तर आमची हीट विकेट काढायची असं अनेकदा होतंय. प्रचारात धर्म, देवाच्या नावावर मते मागितली जात आहेत ते योग्य आहे की अयोग्य याबाबत निवडणूक आयोगानं खुलासा करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, १९८७ मध्ये विलेपार्ल्यात पोटनिवडणूक लागली होती. रमेश प्रभू हे आमचे विजयी झाले होते. ही देशातील पहिली निवडणूक होती जी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली गेली आणि जिंकली गेली. या निवडणुकीत भाजपाही आमच्या विरोधात होती. त्या निवडणुकीपासून अगदी १९९५ साली आमचे सरकार आले तोपर्यंत आमचे ५-६ आमदार त्यात सुभाष देसाई, सूर्यकांत महाडिक, बापू खेडेकर, रमाकांत मयेकर आणि रमेश प्रभू हे बाद ठरवले गेले, परंतु सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे, लोकशाहीतला मुलभूत असलेला मतदानाचा अधिकार यांच्यासह शिवसेनाप्रमुखांचा ६ वर्षासाठी काढून घेण्यात आला होता. कारण बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा प्रचार केला, मंदिर वही बनाएंगे असं म्हटलं होते. त्यावेळी निवडणूक आयोगाने बाळासाहेबांसोबत आमच्या नेत्यांवर कारवाई केली होती अशी आठवण त्यांनी करून दिली.
त्याचसोबत आज निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या आचारसंहितेत, नियमावलीत काही बदल केले अशी शक्यता वाटते. केले असतील तर ते सगळ्यांना सारखे असायला हवेत. कर्नाटकात पंतप्रधान मोदींनी बजरंग बली की जय म्हणून मतदान करण्यास सांगितले होते. अमित शाह यांनी अलीकडेच मध्यप्रदेशात जे भाजपाला मतदान करतील त्यांना रामलल्लांचे दर्शन मोफत घडवू. धर्म आणि देवाच्या नावावर मतदान मागणे हे आचारसंहितेत बसत की नाही? जर बसत असेल तर आम्ही देखील पुढच्या निवडणुकीत जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जय श्रीराम, गणपती बाप्पा मोऱ्या म्हणून मतदान मागू. आचारसंहितेत जर निवडणूक आयोगाने बदल केला असेल तर तो कधी केला याबाबत कळवावे. आताही निवडणूक आयोगाने राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना या निर्णयाबाबत अवगत करावे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
दरम्यान, गर्व से कहो हम हिंदू है हा नारा बाळासाहेबांनी बुलंद केला, हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून ६ वर्ष मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता. आज निवडणूक आयोगानं आचारसंहितेत बदल केले असावेत. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री धर्म, देवाच्या नावावर मते मागत असतील तर कदाचित निवडणूक आयोगाने आचारसंहितेत बदल केला असावा. जर बदल केला असेल तर सर्व राजकीय पक्षांना ते अवगत करावे. भाजपाचा कारभार रामभरोसे चालला आहे. मी राजकारण आणू इच्छित नाही. जो प्रचार सुरू आहे तो चुकीचा आहे की बरोबर हे निवडणूक आयोगाने कळवावे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.